Dainik Maval News : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात एका मद्यपी तरूणाने चारचाकी वाहन चालवून अनेकांना धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. अपघातात बारा जण जखमी झाले असून यातील काहीजण हे एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. सदाशिव पेठेत सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास एका चहाच्या स्टॉलजवळ हा प्रकार घडला.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार चालक आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. जखमींपैकी अधिकाधिक तरूण हे एमपीएससी परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. रविवारी (दि. 1 जून) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त परीक्षा होत आहे, त्यामुळे विद्यार्थी पुण्यात आलेत. जखमींपैकी तीन विद्यार्थी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- भावे हायस्कूल जवळील श्रीनाथ अमृततुल्य येथे ही घटना घडली. पोलिसांनी, मद्यपी चालक जयराम शिवाजी मुळे (वय 27, रा. बिबवेवाडी) आणि त्याचे मित्र दिगंबर शिंदे (वय 27), राहुल गोसावी (वय 27) यांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी जखमींची नावे आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल
भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी काही विद्यार्थी असून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्याची एक परीक्षा उद्या होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway
