Dainik Maval News : तालुक्याचे महसूली केंद्र असलेल्या वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ता आणि जुना पुणे-मुंबई हायवेलगत असणारे सेवा रस्ते लवकरच अतिक्रमणापासून मुक्त होऊन मोकळा श्वास घेऊ शकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक धोरण स्वीकारले असून येत्या 24 तासांत नागरिकांनी रस्त्यांवरील स्वतःचे अतिक्रमण स्वखर्चाने काढून टाकाने, अन्यथा नगरपंचायत प्रशासन ते काढून टाकेल, असे जाहीर आवाहन नगरपंचायत प्रशासनाने मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
वडगाव नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन
“वडगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य बाजारपेठ परिसर तसेच वडगाव–तळेगाव साखळी रस्त्यालगत सार्वजनिक रस्त्यांवर काही व्यक्तींनी, पथविक्रेत्यांनी, व्यवसायिकांनी अनधिकृतपणे टपऱ्या, शेड, हातगाड्या, व्यावसायिक साहित्य, व्यावसायिक आस्थापने समोरील पत्र्याचे शेड, दुकानाच्या नावाच्या पाट्या, नागरिक वाहन पार्किंग करू नये म्हणून ठेवण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व इतर स्वरूपाची अतिक्रमणे केल्याचे निदर्शनास आले आहे.”
“सदर अतिक्रमणांमुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, पादचारी व वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्याचा वापर बाधित होऊन वाहतूक कोंडी निर्माण होणे व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने सर्व पथविक्रेते व्यवसायिक अतिक्रमणधारक यांना वारंवार सूचना /नोटीस देऊनही संबंधितांनी अतिक्रमणे हटविलेली नाहीत”,
“या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायतीमार्फत संबंधित अतिक्रमणधारकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, मुख्य बाजारपेठ परिसरातील सार्वजनिक रस्ते तसेच वडगाव–तळेगाव साखळी रस्ता हद्दीतील सर्व अनधिकृत अतिक्रमणे सदर जाहीर आवाहन प्रसिद्ध झाल्यापासून २४ तासांच्या आत तात्काळ स्वतःहून स्वखर्चाने हटवून सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत. विहित मुदतीत संबंधितांनी अतिक्रमणे न हटविल्यास वडगाव नगरपंचायतीमार्फत नियमानुसार अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येईल.”
“सदर कारवाईसाठी येणारा खर्च शास्ती सहित संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल. तरी नागरिकांनी सार्वजनिक रस्ते, पदपथ व वाहतुकीच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण करू नये तसेच नगरपंचायतीच्या आवाहनास सहकार्य करून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे.”
संपूर्ण शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती सुरू
वरील जाहीर आवाहनासमवेत नगरपंचायत प्रशासनाने संपूर्ण शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे अतिक्रमणाविरोधात जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे. शासकीय वाहनांवरील लाऊडस्पीकरद्वारे अतिक्रमण काढण्याच्या सुचना नागरिकांना देण्यात येत आहेत.
नगरसेवकांचाही ठरावाद्वारे पाठींबा
दरम्यान शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवावेत, रस्ते मोकळे व्हावेत, वाहतूक सुधरावी याकरिता काही महिन्यांपूर्वीच नगरसेवकांनी ‘अतिक्रमण विरोधी कारवाई’ करण्यासाठी ठराव करून दिला होता, अशीही माहिती समोर येत आहे. एकुणच लोकप्रतिनिधी देखील अतिक्रमण काढण्यासाठी सकारात्मक असल्याने आता प्रशासन स्वतः किती ताकदीने ही कारवाई करते, हे पाहावे लागेल.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’
