Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत मावळ तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेत आयोजित केली होती. यावेळी साळे यांनी योजनेबाबत प्राथमिक माहिती दिली व तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. जिल्हा संसाधन व्यक्ती हेमंत कापसे यांनी योजनेचे संपूर्ण निकष, कोणकोणते प्रकल्प यात पात्र आहेत, अनुदान, अर्ज प्रक्रिया, बँक कर्ज प्रक्रिया याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या योजनेंतर्गत मावळ तालुक्यामध्ये फळे व भाजीपाला निर्जलीकरण (डिहायड्रेशन), दुग्ध प्रक्रिया, कुल्फी उद्योग, चिक्की उद्योग, बेकरी उद्योग, राइस मिल, फरसाण नमकीन उद्योग, लाकडी घाणा तेल उद्योग प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत मुख्यत्वे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी खर्चाच्या ३५% जास्तीत जास्त १० लाखाच्या मर्यादित अनुदान दिले जाणार आहे. स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल, सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणुकीकरीता भांडवल रक्कम रुपये चार लाख प्रति बचत गट एवढा लाभ दिला जाणार आहे.
या अंतर्गत एका गटातील कमाल दहा सदस्यांना प्रत्येकी रु.४० हजार रुपये सीड कॅपिटल म्हणून देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत विविध लाभार्थी प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत “क्रेडीट लिंक्ड सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
लाभार्थी गुंतवणूक किमान दहा टक्के आवश्यक असून उर्वरित रक्कम बँक कर्ज आहे. क्षेत्रीय सुधारणा, हॅन्ड होल्डींग सपोर्ट, प्रकल्प आराखडा तयार करणे, कौशल्य प्रशिक्षण, बँक कर्ज, उद्योग आधार किंवा इतर परवाने काढण्यासाठी योजनेंतर्गत मदत मिळणार आहे.
यावेळी कृषी अधिकारी संताजी जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच तालुक्यातील योजनेमध्ये लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी उपस्थित होते. आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे यांनी सूत्रसंचालन केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले

