वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, या कामामध्ये कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र जाईल? हे निश्चित करण्यासाठी आवश्यक क्षेत्राची प्रथम मोजणी करुन द्यावी, असा प्रस्ताव ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी मांडला. त्याला संबंधित शेतकऱ्यांनी संमती दिल्याने लवकरच या क्षेत्राची मोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी नियोजित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा महामंडळाच्या (महारेल) अधिकाऱ्यांनी नुकतीच बाधित शेतकऱ्यांची पंचमुखी मारुती मंदिराच्या प्रांगणात बैठक घेतली. उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र विरोध दर्शविला. तसेच पुलाची जागा बदलण्याची मागणी केली. ( Farmers opposition to planned flyover on site of Keshavnagar railway gate at Vadgaon Maval )
या बैठकीला ‘महारेल’च्या पुणे कार्यालयातील अधिकारी महेश ढेमरे, ज्ञानेश्वर साळुंखे, अनिकेत पाटील, रूप सिंग, हमीद शेख, भूषण बिडवे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, माजी नगरसेवक दिनेश ढोरे, मारुती चव्हाण, नितीन चव्हाण, बाळासाहेब तुमकर, ज्ञानेश्वर ढोरे, विराज हिंगे, संजय दंडेल, अर्जुन ढोरे, गणेश ढोरे, श्रीनिवास गोरे आदी उपस्थित होते.
यापूर्वी वडगावच्या रेल्वे फाटकाच्या जागेवर भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू होते. परंतु, त्याला विरोध झाल्याने नंतर तो रद्द करण्यात आला. या भागाची भविष्याची गरज लक्षात घेऊन येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, या प्रकल्पात जमिनी गेल्यास भूमिहीन होण्याची भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर, उड्डाण पुलाच्या कामासाठी जेवढे आवश्यक तेवढेच व कमीत कमी क्षेत्र संपादित केले जाईल. तसेच बाधित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला दिला जाईल, असे आश्वासन ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी दिले.
अधिक वाचा –
– पिंपरी विधानसभेतून खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – आमदार अण्णा बनसोडे
– महत्वाची बातमी! निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध । Lok Sabha 2024
– जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News