भारतातील हरित क्रांतीचे जनक, ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी (दिनांक 28 सप्टेंबर) 98 व्या वर्षी निधन झाले. डॉ. स्वामीनाथन हे एक स्वातंत्र्योत्तर भारताच्या वाटचालीतील उल्लेखनीय व्यक्ती होते. त्यांच्या कृषी संशोधन आणि नवकल्पना यातील अमूल्य योगदानामुळे भारताची वाटचाल लक्षणीयरित्या बदलली. भारताची कृषी क्षमता वाढवण्यात, लाखो लोकांना भुकेच्या तावडीतून सोडवण्यात आणि नागरिकांच्या जीवनात परिवर्तनीय बदल घडवून आणण्यात स्वामीनाथन यांचा मोलाचा वाटा राहिलाय. ( Father of Green Revolution Agri Scientist Ms Swaminathan Passed Away )
एम. एस. स्वामीनाथन यांनी 1961 ते 1972 या 11 वर्षांच्या काळात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले. 1972 ते 1979 या काळात ते आयसीएआरचे महासंचालक आणि केंद्रीय कृषीय विभागाचे सचिव म्हणून काम पाहत होते. पुढच्याच वर्षी त्यांची कृषी खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. 1980 ते 82 या तीन वर्षांत त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यानंतर सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. 1982 ते 88 या 7 वर्षांत त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्युटचे महासंचालक म्हणूनही काम केले. 2004 साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त…
“भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा, कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा, शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेला महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना #श्रद्धांजली अर्पण केली आहे.” – एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)
- “विशिष्ट क्षेत्रात कार्य करणार्या सुप्रसिद्ध व्यक्तींचे उल्लेखनीय काम त्यांच्या नावाशी कायमचं जोडले जाते. तसेच डॉ. स्वामिनाथन म्हणजे हरित कृषिक्रांतीचे जनकच, त्यांच्या कर्तृत्वाचा हा शिखरबिंदूच जणू, हे खरे असले तरी, इतर अनेक क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांची कीर्तिकमान सतत उंचावत गेल्याचे प्रत्ययाला येते. डॉ. स्वामिनाथन म्हणजे एक उत्तुंग आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्वच. अशा विश्वव्यापी कार्याची ओळख असणाऱ्या स्वामिनाथन यांना भावपूर्ण वंदन..!” – शरद पवार (खासदार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
“भारतीय हरितक्रांतीचे जनक, पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देशाला कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कृषी क्षेत्राचा विकास हाच ध्यास घेऊन आणि देशासह शेतकरी हित हेच ध्येय मानून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!” – छगन भुजबळ (मंत्री, महाराष्ट्र राज्य)
स्वामीनाथन आयोग…
राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या माध्यमातून स्वामीनाथन यांनी वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करुन 2006 साली सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता. त्या अहवालात, शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा अशी शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली होती.
एम. एस. स्वामीनाथन यांना मिळालेले पुरस्कार…
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा 1987 साली पहिल्या विश्व अन्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यानंतर स्वामीनाथन यांनी चेन्नईमध्ये एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनची स्थापनाही केली. एम. एस. स्वामीनाथन यांना पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय एच. के. फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1971) व अल्बर्ट आईनस्टाईन वर्ल्ड सायन्स अवॉर्ड (1986) हे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कारही मिळाले होते. ( Father of Green Revolution Agri Scientist Ms Swaminathan Passed Away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे इथे राजे उमाजी नाईक यांची 232वी जयंती उत्साहात साजरी; आप्पासाहेब चव्हाण यांची उपस्थिती
– सुट्ट्याच सुट्ट्या…! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी
– सुदवडी गावात गणेशभक्तांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून स्पर्धांचे आयोजन