Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी संप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. आजअखेर या मंदिराचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. वारकरी संप्रदायातील हे पहिलेच भव्य- दिव्य असे मंदिर असून येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण करून भव्य-दिव्य असा लोकार्पण सोहळा करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टकडून देण्यात आली.
मंदिरासाठी स्थापत्यविशारद म्हणून आयोध्यानगरीतील श्री प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर ज्यांच्या अलौकिक स्थापत्यकलेतून विराजमान होत आहे ते चंद्रकांत सोमपूरा व निखील सोमपुरा बंधू कार्यरत आहेत. तसेच मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली आहे.
असे असेल मंदिर –
गांधीनगर, गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. मंदिराची लांबी १७९ फुट, उंची ८७ फुट व रुंदी १९३ फुट असून मंदिराला तीन भव्य कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट ३४ फुट बाय ३४ फुट असून १३.५ बाय १३.५ फुट आकाराची एकूण ५ गर्भग्रहे मंदिरात असणार आहेत. मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहत भक्तीमध्ये दंग झालेली श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे.
मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर ९०० वैष्णवांच्या मूर्तींचे सुंदर असे कोरीव काम असणार आहे. त्याचप्रमाणे विश्ववंदनीय जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संपूर्ण हिंदुस्तानामध्ये रयतेचे राज्य ही लोकशाही पूरक संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात प्रथम अंमलात आणली ते हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य-दिव्य शिल्प साकारले जाणार आहे.
भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link