Dainik Maval News : मान्सून पाऊस कोकण किनारपट्टीला धडकलेला असताना ठाण मांडून बसलेल्या अवकाळी पावसानेच मावळवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मावळमधील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले व वर्षाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात सोमवारी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. अवघ्या चोवीस तासात लोणावळा शहरात तब्बल २३३ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळा शहरात मागील आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुळ मान्सूनचे आगमन अद्याप झालेले नसले तरीही मान्सूनला तोडीस तोड असा मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस शहरात कोसळत आहे. सोमवारी सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा शहरात अवघ्या २४ तासात २३३ मि.मी. अर्थात ९.१७ इंच इतका पाऊस झालाय. यंदाचा एकूण पाऊस ४१० मि.मी. वर पोहोचला आहे.
शनिवार-रविवार असल्याने पहिल्या पावसाच्या सरींचा आनंद घेण्यासाठी आणि वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळा शहरात दाखल झाले होते. मुंबई, ठाणे, पुणे भागातून हजारो पर्यटक लोणावळा शहरात आले होते. त्यामुळे शहरात वाहनांची व पर्यटकांची गर्दी झालेले पाहायला मिळाली. याचा तान प्रशासनावर आणि वाहतूक पोलिसांवर आला होता. अनेकदा शहरातील प्रमुख चौकांत वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती. तर वाहनांची संख्या वाढल्याने जुना पुणे – मुंबई महामार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरू होती.
रविवारी सकाळपासून कमी अधिक पाऊस आणि दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. यामुळे शहरातील रस्त्यांवर सखल भागात पाणी साठले होते, तर नाले-ओढे प्रवाहित झाले. गवळीवाडा भागात व परिसरातील काही प्रभागांत काही घरांमध्ये पाणी घुसल्याचे वृत्त समोर आले आहे. अनेक वर्षांनंतर मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल झाला आहे. तसेच यंदा पाऊस अधिक असण्याचाही अंदाज आहे, त्यापार्श्वभूमीवर लोणावळा शहर प्रशासनाने सर्वांगिण विचार करता योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा, अवकाळी उडाली तशीच दैना मान्सून पावसात उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन
