Dainik Maval News : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक मंडळे, नवरात्र उत्सव मंडळ, दुर्गा दौड, पथ-संचलन व शस्त्र पूजन करणाऱ्या संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, नवरात्र उत्सवात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी महिला मुलींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. न्यायालयाच्या व शासनाच्या अटी शर्तींचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद घेवरे यांनी केले.
सार्वजनिक मंडळांनी रस्त्यात अडथळा निर्माण होणार नाही, असे मंडप उभारावे. प्रबोधनात्मक देखावे अथवा फलक लावावे. गरबा खेळण्यासाठी महिला व मुली असल्याने मंडळांनी स्वयंसेवक नेमावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महिलांची छेडछाड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महिलांनीही दागदागिने सांभाळावेत. रावण दहन, दुर्गा दौड पथसंचलन आणि शस्त्र पूजन करणाऱ्या संघटनांनी दक्षता घ्यावी, आदी सुचना उपस्थितांना देण्यात आल्या.
पोलिसांकडून चोख बंदोबस्त –
देहूरोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुमारे 27 नवरात्र उत्सव मंडळे असून 14 मंडळे मिरवणूक काढत असतात. एक मंडळ महिलांसाठी गरबाचे आयोजन करत असते. देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये 2 पोलीस निरीक्षक, 10 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस अमलदार असून प्रत्येक मंडळाजवळ 2 पोलीस अंमलदार देखरेखीसाठी नियुक्त करण्यात येणार असून गृहरक्षक दलातील जवानही असणार आहेत. सर्व अधिकारी गस्त करणार असून पेट्रोलिंग व मार्शल पोलीस असणार आहेत. न्यायालय व शासनाचे नियमांचे पालन करून शांततेमध्ये उत्सव साजरा करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्या होणार प्रदुषणमुक्त ; राज्य सरकारकडून 1967 कोटींचा निधी मंजूर
– अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन । Pimpri-Chinchwad
– ‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर नाही तर चार एकर जमीन मिळावी’ । Pavana Dam News