वडगाव शहरातील एका अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून अनेकांना ताब्यात घेतले आहे.
वडगावातील माळीनगर भागात रोशन मंजिल नावाच्या बिल्डिंग मध्ये सुरु असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगार अड्डयावर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि वडगाव मावळ पोलिसांनी धाड टाकत त्या ठिकाणाहून 16 लाख 84 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह 10 जणांना ताब्यात घेतले, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली. ( IPS Satyasai Karthik squad raids Matka gambling den in Vadgaon 10 persons detained along with material )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वडगाव मावळ येथील माळीनगर भागात वाहतूक पोलीस मदत चौकीच्या पाठीमागे रोशन मंजिल नावाच्या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर बिरज रामविलास माथुर यांचे मालकीच्या सदनिका क्र. 5 व 6 मध्ये मदन मारुती बाजे रा. खंडोबा माळ तळेगाव दाभाडे व बिरजू रामविलास माथुर रा. संस्कृती सोसायटी, वडगाव मावळ यांच्या मार्फत कल्याण मटका नावाने जुगारीचा अड्डा चालविला जात असून त्याठिकाणी अनेकजण उपस्थित आहे.
हि माहिती मिळताच सत्यसाई कार्तिक यांनी 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडगाव पोलिसांच्या टीमला सोबत घेऊन त्याठिकाणी संयुक्त धडक छापा टाकला असता, जुगाराचे अड्ड्यावरून रोख रक्कम, 3 चारचाकी वाहने, 5 दुचाकी वाहने, 16 मोबाईल फोन असे मिळून 16,84,500 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या जुगार अड्डयावर कल्याण मटका जुगाराच्या रक्कमेचा हिशोब करताना पोलीस पथकाने यशस्वी छापा कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा – लोणावळा पोलिसांची धडक कारवाई! खंडाळ्यात ऑनलाईन मटक्यावर छापा, 1 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त
या जुगाराचे अड्ड्यावरून मदन मारुती वाजे (रा. खंडोबा माळ तळेगाव दाभाडे), नवनाथ पंढरीनाथ भिलारे (रा. भिलारेवस्ती वडगाव मावळ), लालजी लक्ष्मीदास ठक्कर (रा. रिव्हर रोड, बौद्धनगर), नितीन बालु कांबळे (रा. मिलींदनगर, वडगाव मावळ), इरफान लतिफ शेख, (रा. पारशीचाळ, देहूरोड), भिमराव हरिश्चंद्र गायकवाड (रा. शिवणे ता. मावळ), तसेच राहुल संभाजी पवार (रा. मिलींदनगर, वडगाव मावळ), योगेश दशरथ शिंदे (रा. नानोली ता. मावळ), आकाश शिवाजी इंगळे (रा. दिग्विजय कॉलनी, वडगाव मावळ), करण रमेश पवार (रा. टाकवे बु॥ ता. मावळ) यांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 (अ), 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयामध्ये जुगाराचे अड्ड्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सदनिका उपलब्ध करून देणारा इसम बिरजु रामविलास माथुर तसेच त्यांचे इतर साथीदार मिळून आलेले नाहीत, असे सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.
या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी स.पो.नि सचिन कोमलसिंग राउळ, पो. हवा. राजु लांडे, पो. हवा अंकुश नायकुडे, पो.ना. दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. सुभाष शिंदे तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, पो.हवा देशमुख, पो.कॉ प्रतिक बनसोडे यांनी छापा कारवाई मध्ये सहभाग घेतला होता. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे करत आहेत.
अधिक वाचा –
– जवणच्या घाटात ब्रेक फेल लालपरीचा थरार! बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
– दुर्दैवी! जिथे आडोसा घेतला तिथेच काळाने घाला घातला, किवळे इथे होर्डिंग्ज कोसळून 5 जण ठार