खालापूर तालुक्यातील (जि. रायगड) तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शेत तलावाशेजारच्या डोंगराला दिनांक 26 डिसेंबर रोजी लागलेला वणवा विझवताना वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांना शेततळ्यात रात्रीच्या अंधारात हालचाल होताना दिसली. त्यांनी विजेरीच्या प्रकाशात अंदाज घेतला असता काही साप तलावाच्या पाण्यात पडलेले पाहिले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या दिवशी दिलीप बांगरा या स्थानिक युवकाने तलावात एकूण सात साप असल्याचे त्यांना कळविले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तलावात अडकून पडलेल्या सापांना वर काढण्यासाठी सर्पमित्रांची मदत घेण्याचे ठरले. त्यानुसार खालापूर – खोपोली स्नेक रेस्क्यूअर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना त्या ठिकाणी पाचारण केले गेले. तलावात अडकून पडलेल्या सापांपैकी सहा साप हे घोणस जातीचे विषारी, तर एक नानेटी जातीचा बिनविषारी साप होता. ते साप खूप वेळ पाण्यात असल्याने त्यांची हालचाल मंदावलेली दिसत होती. सापांना तलावात असलेल्या गुळगुळीत प्लॅस्टिकच्या आवरणामुळे वर येण्यास जमत नव्हते, ते बिथरलेल्या अवस्थेत असल्याने ॲटॅकिंग पोझिशन मध्ये होते. त्यांना सहजासहजी बाहेर काढणे जिकरीचे होते. त्या कारणे सेफ्टी बेल्ट व अन्य सुरक्षेची साधने वापरून जवळ जवळ दोन तासांच्या प्रयत्नानंतर सर्व सापांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे शक्य झाले. त्या सर्व सापांना सुरक्षित वन क्षेत्रात रिलीज केले आहे.
दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, सुशील गुप्ता, अशोक मेस्त्री, शुभम कंगळे, महेश भोसले, धर्मा पाटील आणि गुरुनाथ साठेलकर यांनी योजनाबद्ध रीतीने हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. एवढ्या जास्त संख्येने एकाच ठिकाणी घोणस जातीचे विषारी साप आढळून येण्याची आणि त्यांना सुखरूप रेस्क्यू करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जेष्ठ सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी सांगितले. ( Khopoli Snake Rescuers rescue 6 snakes in Raigad Khalapur taluka )
शेतीसाठी या तलावाचा वापर होत असतो त्याचप्रमाणे गावकऱ्यांची देखील त्या ठिकाणी ये-जा असते. याकरणे सर्प दंशाची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. खालापूर तालुक्याचे वन विभागाचे कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना दृष्टीपथास आली. या दुर्गम ठिकाणी येऊन आपला जीव धोक्यात घालून दोन्ही रेस्क्यू टीमनी संयुक्तपणे मोहीम राबवून त्या सापांना जीवदान दिल्याबद्दल या शेततळ्याचे निर्माते गोदरेज कंपनीचे अधिकारी तानाजी चव्हाण आणि तांबाटी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळा पोलिस इन ॲक्शन मोड! वेहेरगावातील मटका अड्ड्यावर धडक कारवाई, 16 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा
– नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडताय? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर येण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा