Dainik Maval News : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर तिघांनी चाकूहल्ला केला. यामध्ये ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. १८) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास लोणावळा येथील मॅगी पॉईंट जवळ घडली.
रुपेश श्रीराम शेलोकर (वय ३२, रा. तुगांर्ली, लोणावळा) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय गणेश नायडू, विजय गणेश नायडू आणि विजय नायडू याची पत्नी (सर्व रा. हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश शेलोकोर हे मॅगी पॉईट येथील आकाश येवले यांच्या टपरीवर मॅगी खात होते. त्यावेळी अजय नायडू हा टपरी मालक आकाश येवले यांच्याशी वाद घालत होता. रुपेश यांनी या भांडणात मध्यस्थी केली.
अजय याला ‘भांडण करु नको’ म्हणून तर ‘तुला काय खायचे ते खा’ असे रुपेश यांनी समजावले. त्याचा राग येवून अजय नायडू याने त्याचा भाऊ विजय नायडू व त्याच्या पत्नीला बोलावून घेत रुपेश यांच्यावर चाकूहल्ला केला. तसेच काठीने मारहाण करत जखमी केले. लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.