Dainik Maval News : लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
परळी येथील स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडप कृषि उत्पन्न बाजार समिती येथे एका दिमाखदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषि महोत्सव 2024 चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधानपरिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ( Ladka Shetkari Abhiyan in Maharashtra Namo Shetkari Mahasanman Yojana installment deposited in farmers accounts )
- यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीन, कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. याची सुरुवात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि त्यांना सन्मान मिळवून देणारी असल्याचे नमूद करून ही योजना सुरु केल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले. राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रात न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगून ते म्हणाले की, केवळ 1 रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे कृषिमंत्री चौहान म्हणाले.
सर्वसामान्य गरीब नागरिक हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन विविध योजनाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून जवळपास सव्वाकोटी माता-माउलींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच गरीब कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे 52 लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– ताजे गावातील ‘चेतन’ची ग्रामविकास अधिकारीपदी निवड, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीने मिळविले यश । Maval News
– देवले गावातील शेतकऱ्याचा पोरगा बनला पोलीस अधिकारी ; एकाच आठवड्यात दोन ठिकाणी निवड । Maval News
– साते गावातील सद्गुरू आगळमे याची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात निवड, गावकऱ्यांनी खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक । Maval News