लोकसभा निवडणूकांचे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. देशात पुन्हा एकदा मोदीराज येत असल्याचे दिसत असले तरीही यावेळची मोदींची सत्ता ही एकट्या भाजपाच्या जीवावर नसून संपूर्ण एनडीएतील घटकपक्षांच्या जीवावर असणार आहे. हे चित्र मंगळवारी (दि. 4 जून) दुपारीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे बुधवारी (दि. 5 जून) घाईघाईने एनडीएची बैठक दिल्लीत बोलावण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिल्लीतील या बैठकीत एनडीएच्या प्रमुख घटकपक्षांनी सत्तास्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची शिफारस आणि पाठींब्याचं पत्र भाजपाकडे सोपवल्याची माहिती पुढे येत आहे. अशात याच बैठकीत एनडीएतील घटकपक्षांसोबत भाजपाने जागावाटपाचीही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यंदा स्थापन होणाऱ्या 18व्या लोकसभेत भाजपा पूर्णतः त्यांच्या मित्रपक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना आता प्रत्येक पायरीवर घटकपक्षांचा विचार करावा लागणार आहे. एकीकडे इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्याचे वृत्त पुढे आल्याने भाजपाने तातडीने एनडीएतील प्रमुख घटकपक्षांना जवळ करून कार्यभाग आटोपण्यावर जोर दिला.
कुणी किती जागा मागितल्या ?
एका रिपोर्टनुसार टीडीएमच्या चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए सरकारमध्ये आपली 7 जागांची मागणी केली आहे. तर नितीश कुमार यांनी 5 जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागी संधी मिळू शकते, तर चिराग पासवास यांसह मांजी यांनीही प्रत्येकी 2-2 जागांसाठी विचारणा केली असल्याचे वृत्त समोर येत आहे. ह्याबद्दल खात्रीशीर आकडेवारी अद्याप समोर आली नसली तरीही एनडीएतील घटकपक्षांचे महत्व आणि खासदारकीच्या जागा पाहता, त्यांच्या मतांचा विचार करणे आता भाजपासाठी अनिवार्य आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किमान 2 मंत्रिपद फिक्स –
एकनाथ शिंदे यांनी आज एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावानिशी आपल्या पक्षाच्या पाठींब्याचे पत्र दिले. त्यामुळे आता ते एनडीए सरकारमध्ये सहभागी होणार, यात शंका नाही. परंतू 7 खासदारांच्या संख्येमुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली असून त्यांच्या मागण्यांना भाजपा नजरेआड करू शकणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा असली तरीही त्यांना 2 मंत्रिपदे मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.
श्रीरंग बारणेंचे कॅबिनेट जवळपास फिक्स –
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एनडीए सरकारमध्ये 2 किंवा 3 मंत्रिपदे जरी मिळाली, तरीही निवडून आलेल्या 7 खासदारांमध्ये याबाबत मोठी स्पर्धा आहे. शिवसेनेत मंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्या खासदारांत सर्वाधिक प्रबळ दावेदार हे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे आहेत, यात शंका नाही. ( Lok Sabha Result 2024 NDA government will Form Shiv Sena MP Shrirang Barne chance for ministerial post )
श्रीरंग बारणे यांची संसदेतील कामगिरी आणि विजयाची हॅटट्रीक मंत्रिपदाच्या हक्कासाठी पुरेशी आहे. मावळ लोकसभेत सलग तिसरा विजय आणि शिवसेनेची पारंपारिक जागा राखल्याने बारणे केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेत प्रमुख दावेदार आहेत. यासह एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले घनिष्ठ संबंध आणि त्यांच्या बंडाला दिलेली साथ, यामुळे आप्पा बारणे केंद्रात मंत्री बनणारच, असा विश्वास बारणेंच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न यंदा पूर्ण होईल, असे चित्र दिसत आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?
– ‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया
– मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा