Dainik Maval News : भावावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासह गुन्ह्याची कलमे कमी करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून यापूर्वी टप्प्याटप्प्याने एक लाख ३० हजार रुपये स्वीकारल्यानंतर आणखी २० हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
नाथा रामकिसन केकान (वय ३०) असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील कलमे कमी करणे, तसेच भावाला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात केकान यांनी तक्रारदाराकडून वेळोवेळी एक लाख ३० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.
दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी संबंधित गुन्ह्यात पुढील तपासात मदत करणे, आरोपीला लवकर आरोपपत्र दाखल करून दिलासा मिळवून देणे, तसेच अन्य कामांसाठी केकान यांनी आणखी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार, लोणावळ्यातील मँगो गार्डनशेजारील न्यायालय परिसरात तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना केकान यांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, संबंधित पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळातील ऊसतोड मजुरांच्या पालावर मंत्री पंकजा मुंडेंची मायेची भेट ; दुष्काळामुळे स्थलांतरित ऊसतोड मजूरांसमवेत दिवाळी साजरी
– पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप ; शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न
– श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी येथील मंदिर जतन, संवर्धन व परिसरातील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश



