Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. परंतु सुनिल शेळके यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मावळ भाजपाचे प्रमुख नेते बाळा भेगडे, गणेश भेगडे, रविंद्र भेगडे यांनी पक्षासोबत बंडखोरी करीत राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे.
पक्षातील प्रमुख नेत्यांनीच अशी भूमिका घेतल्याने तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. अशातच आता भाजपाचे प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले असल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समोर असलेले कोडे सुटले असून सर्व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारापाठी उभे राहताना दिसत आहेत.
बाळा भेगडे, गणेश भेगडे यांच्या भूमिकेनंतर भाजपातील अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते. परंतु महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनिल शेळके यांचा प्रचार करण्यास सांगितल्याने भाजपाचे कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोणावळा शहर भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी (दि.6) पार पडली. या बैठकीत संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.
यावेळी लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष अरूण लाड, माजी नगरसेवक तथा गटनेते देवीदास कडू, ज्येष्ठ नेते सुभाष सोनावणे, माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, दादा धुमाळ, मंदा सोनावणे, जयश्री आहेर आदी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही सुनिल शेळके यांचे काम करणार…
राज्यात आम्ही महायुती म्हणून काम करीत आहोत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचे काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही महायुतीचा धर्म पाळत आमदार सुनिल शेळके यांचे काम करणार आहोत, त्यांचा प्रचार करणार आहोत. लोणावळा शहरातील सर्व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील महायुतीचा धर्म पाळतील आणि आमदार सुनिल शेळके यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास अरुण लाड यांनी व्यक्त केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– काँक्रीटीकरण व रुंदीकरणामुळे वडगाव मावळची बाजारपेठ झाली सुसज्ज ! Vadgaon Maval
– पवन मावळ विभागातून बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचार बैठकांना उदंड प्रतिसाद । Bapu Bhegade
– पवनानगर येथील विजयी संकल्प मेळाव्यात सुनिल शेळके यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार ; नागरिकांची तोबा गर्दी