Dainik Maval News : राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच राज्य सरकारने एक मोठे गिफ्ट दिले आहे. शेती व पीक कर्जाशी संबंधित व्यवहारांवर लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला असून याचा थेट लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे की, दोन लाख रुपयांपर्यंतच्या सर्व शेती आणि पीक कर्ज व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेती अथवा पीक कर्जासाठी आवश्यक असणारे करारनामा, गहणाखत, तारण, हमीपत्र, आणि गहाणाचे सूचनापत्रावर मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, 1958 मधील तरतुदींआधारे हा शासन निर्णय नवीन वर्षाच्या एक तारखेपासून लागू झाला आहे.
दरम्यान सरकारने यापूर्वीच प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ केले होते. राज्यातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना त्याचा मोठा फायदा झाला. आता शेतकऱ्यांना कर्जप्रक्रियेत आर्थिक सवलत देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्ज घेण्यासाठी बँकांकडून कर्ज घेताना कागदपत्रांसाठीचा तांत्रिक खर्च लागणार नाही.
- शेतकऱ्यांना कर्ज घेताना विविध प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियांमुळे आर्थिक भार सहन करावा लागत होता. कर्ज करारनामा, गहाणखत, तारण, हमीपत्र, तसेच गहाणाचे सूचनापत्र यांसारख्या कागदपत्रांवर लागणारे मुद्रांक शुल्क अनेकांसाठी अतिरिक्त खर्चाचे कारण ठरत होते. विशेषतः अल्पभूधारक व मध्यम शेतकऱ्यांना हा खर्च जड जात होता. आता शासनाच्या या निर्णयामुळे कर्जप्रक्रिया अधिक सुलभ होणार असून शेतकऱ्यांच्या खिशावर पडणारा अनावश्यक आर्थिक ताण कमी होणार आहे.
या निर्णयाचा लाभ राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच ग्रामीण बँकांमार्फत घेण्यात येणाऱ्या शेती व पीक कर्ज व्यवहारांना मिळणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत येणाऱ्या सर्व संबंधित दस्तऐवजांवर कोणतेही मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही.
कोणत्या कायदेशीर दस्तऐवजांना मिळणार सूट ?
दोन लाख रुपयांपर्यंतच्या तारण, तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभूती बंधपत्र, गहाणखत, गहाणाची सूचना देणारे पत्र, घोषणापत्र तसेच त्यासोबत जोडल्या जाणाऱ्या अन्य कायदेशीर दस्तऐवजांनाही ही 100 टक्के मुद्रांक शुल्क माफी लागू राहणार आहे. त्यामुळे कर्ज प्रक्रियेत येणाऱ्या विविध टप्प्यांवर होणारा खर्च थेट वाचणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट