महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत थंड झालेल्या आरक्षणाच्या मागणीने आचारसंहिता संपताच पुन्हा एकदा जोर धरला आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी फक्त मराठा समाज नाही तर ओबीसी समाज देखील आरक्षणाबाबत काही मागण्या घेऊन रस्त्यावर उतरला आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हे मागील अनेक दिवसांपासून आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. लक्ष्मण हाकेंच्या या आंदोलनावर आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हाकेंची प्रकृती खालावली –
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ उपोषण सुरू केले आहे. आज (दि. 19) उपोषणाचा सातवा दिवस आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून हाके यांची प्रकृती खालावत चालली आहे. आता त्यांचा रक्तदाब वाढला असून त्यांना हृदयविकाराचा धोका संभवतो, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. लक्ष्मण हाके यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली.
‘हाकेंच्या आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. तीन-चार दिवसांपासून त्यांचा रक्तदाब वाढत आहे. कालपेक्षा आज रक्तदान वाढला आहे. पल्स 98 असून ऑक्सिजन लेव्हल 98 आहे, ब्लड शुगर 81 वर आली आहे. त्यामुळे त्यांच्या हृदयावर दबाव येऊ शकतो. त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे’, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
ओबीसींचे आंदोलन सरकार पुरस्कृत –
दुसरीकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. तसेच मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचेही जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ( Maratha protester Manoj Jarange Patil criticizes OBC leader Laxman Hake hunger strike )
‘भारतात लोकशाही आहे, त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC-ST ला धक्का लागणार नाही, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याचे आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येतं. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुन लक्षात येतं आहे. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.’ अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना जरांगेंनी दिली.
अधिक वाचा –
– एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे मावळमध्ये 70 वर्षीय आजोबांचा कर्करोग झाला बरा ! तळेगाव येथे राज्यातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
– पंढरीची वारी ठरणार ‘आरोग्यवारी’ ! पालखी मार्गावर मिळणार आरोग्य विषयक सेवा-सुविधा, वाचा सविस्तर
– ‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील’ – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील