तब्बल दीड महिन्यांच्या धामधुमीनंतर आता प्रत्यक्ष मंगळवारी अर्थात 4 जून रोजी लोकसभा निवडणूकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. काल परवा जाहीर झालेल्या एक्झिट पोलमुळे निकालाची उत्सूकता अधिक ताणली गेली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यांचीही उद्या मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले आहे. उद्या (दि. 4 जून) होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बालेवाडी भागातील वाहतूक मार्गात काही बदल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही उद्या मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या कालावधीत सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बालेवाडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. हा बदल मंगळवारी, दिनांक 4 जून पहाटे 5 पासून ते रात्री साडेअकरा पर्यंत असेल किंवा आवश्यकतेनुसार गर्दी संपेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहणार आहे. ( Maval Lok Sabha Vote Counting Change in traffic route in Pune Balewadi area )
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा ;
– बालेवाडी स्टेडीयम मुख्य प्रवेशद्वारा समोरील रस्ता उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग :
1) चांदे- नांदे व म्हाळुंगे गावातून येणारी वाहने ही उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकी येथून पुढे राधा चौकाकडे व इच्छितस्थळी जातील.
2) राधा चौकातून येणारी वाहने ही म्हाळुंगे पोलिस चौकी येथे डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, चांदे- नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील.
– मंगळवारी पहाटे 5 ते रात्री साडे अकरा या वेळेत जड व अवजड वाहनांना म्हाळुंगे गाव ते राधा चौक आणि राधा चोक ते म्हाळुंगे गाव या मार्गावर प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग :
1) चांदे नांदे येथून येणारी जड अवजड वाहने ही गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण मार्गे हिंजवडी येथे येऊन इच्छित स्थळी जातील, व बाणेर रस्ता व राष्ट्रीय महामार्गावरून येणारी जड अवजड वाहने ही राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व पुढे इच्छित स्थळी जातील.
कार्यकर्ते किंवा निकालासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी गाड्यांची पार्किंग व्यवस्था खालीलप्रमाणे असेल ;
1) म्हाळुंगे पोलिस चौकी ते उत्तम स्विट (पुणेरी स्वीट) चौक या मधला रस्ता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी राधा चौकातून पुढे डाव्या बाजुला खंडोबा मंदिराच्या पाठिमागील मोकळ्या जागेमध्ये पार्कींगकरीता व्यवस्था केली आहे.
2) ऑर्किड हॉटेल महामार्ग प्रवेशव्दारापासून सुरू होणारा सेवारस्ता हा मुळा नदी ब्रिज पर्यंत रहदारीसाठी बंद ठेवला असून हा रस्ता महायुतीच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी पार्किंगची व्यवस्था त्या सेवारस्त्यावर केली आहे.
3) इतर पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे.
अधिक वाचा –
– वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांना अज्ञातांकडून धमकीचा फोन । Maval News
– धामणे गावात घरफोडी, पाऊणे नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास । Maval Crime
– मावळात पुन्हा बारणेच ? एक्झिट पोलच्या निकालाने महाविकासआघाडीच्या गोटात शांतता, शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला । Maval Lok Sabha Constituency