Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी दहा वाजता ‘मावळभूषण कृष्णराव भेगडे’ जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे अकरावे वर्ष आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, शैलेश शहा, प्राचार्य डॉ संभाजी मलघे, डॉ साहेबराव पाटील, डॉ संजय आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्यानमालेचे उद्घाटन 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे ‘चला घडवू नवी पिढी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दिनांक 27 डिसेंबर रोजी गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व नामांकित उद्योजक संजय मालपाणी यांचे ‘जानो गीता, बनो विजेता’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक व कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया असणार आहेत.
दि. 28 डिसेंबर रोजी लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांचे ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दि. 29 डिसेंबर रोजी समारोपाच्या चौथ्या सत्रामध्ये महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे व इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव (वर्ष 33 वे) आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या माध्यमातून समाजमान्य व्यक्तिमत्त्वांना गदिमा जीवनगौरव सन्मान, गदिमा स्नेहबंध सन्मान, महाराष्ट्र लावणी सम्राज्ञी पुरस्कार, गदिमा चैत्रबन पुरस्कार, गदिमा काव्य साधना पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच काही विशेष निमंत्रित कवींचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांना गदिमा स्नेहबंध पुरस्कार, गदिमा जीवनगौरव पुरस्कार आनंद माडगूळकर, गदिमा चैत्रबन पुरस्कार ऋचा बोंद्रे, महाराष्ट्र लावणी सम्राज्ञी पुरस्कार डॉ. रेश्मा परितेकर- मुसळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. समारंभात अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ उपस्थित राहणार असून माजी संमेलनाध्यक्ष कविवर्य फ.मु.शिंदे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्कारांची घोषणा :
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे यांना, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार उद्धव चितळे यांना पर्यावरण क्षेत्रातील पुरस्कार गिरीश खेर यांना, तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार भारतीय खो-खो संघाची कर्णधार व इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रियंका इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश
