Dainik Maval News : देहू नगरपंचायत कार्यालयात रविवारी (दि. 25 ऑगस्ट) मुख्याधिकारी, सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. देहू नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये याकरिता नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे आमदार सुनिल शेळके यांनी यावेळी सांगितले. तसेच, देहूतील विविध विकास कामांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, ठेकेदार, नगरपंचायतीचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या अडचणीचा विचार करता गणेशोत्सवापूर्वीच सुरू असलेल्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावीत. पदपथावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून बाजार कर वसूल करू नये. कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मंजूर आराखड्यानुसार काम केले असेल तरच भोगवटा प्रमाणपत्र (पुर्णत्वाचा दाखला) द्यावे. अन्यथा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा सक्त सुचना आमदार सुनील शेळके यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. ( MLA Sunil Shelke promises to give 15 crores for development works in Dehugaon )
बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राला अखंड विद्यूत पुरवठा होत नसल्याने गावात सध्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून तातडीने तळवडे परिसरातील एक्सप्रेस फिडर वरून ओव्हर हेड विद्यूत पुरवठा तत्काळ घ्यावा. यासाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करावा. यासाठी दोन ते तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील आमदार शेळके यांनी दिले.
यावेळी काही ठिकाणच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी बैठकीत आल्या. त्यात पेव्हींग ब्लॉक बदलून मिळावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्याबाबतीत संबधीत ठेकेदारांनी पेव्हींग ब्लॉक बदलून द्यावेत, ते कॉंक्रीट रस्त्याच्या कडेला वापरावे, कामाच्या दर्जात कोठेही तडजोड करू नये, अशा सुचना आमदार शेळके यांनी दिल्या. यासह गल्लीत जाणारे मुख्य रस्ते प्राधान्याने करावेत, मुख्य रस्ते 8 इंच आणि अंतर्गत रस्ते 6 इंच जाडीचे कॉंक्रीटचे करावेत, अशीही ताकीद दिली.
अधिक वाचा –
– मावळची बालगायिका अवनी परांजपे रियालिटी शोच्या सेमी फायनलमध्ये दाखल; फायनल जिंकून सुपरस्टार होण्याची आशा
– महिलेचा गळा आवळून मोबाईल चोरीचा प्रयत्न ; वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना । Vadgaon Maval
– आरक्षणाला संविधानाच्या नवव्या अनुसूचित टाकावे; एससी, एसटी वर्गातील आंदोलकांचे तहसीलदारांना निवेदन । Maval News