Dainik Maval News : लोणावळा शहरातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी लोणावळा नगरपरिषद कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी, अभियंते आणि प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक प्रकल्पावरील कामाची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी, निधीची स्थिती आणि पूर्णत्वासाठी लागणारा कालावधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास हा आपला संकल्प आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शन आमदार शेळके यांनी यावेळी केले. तसेच, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सुरक्षाविषयक गरजांशी संबंधित असलेल्या या प्रकल्पांची गती वाढवून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे शेळके यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी लोणावळ्यात येणार
लोणावळा शहरांमधील मागील अनेक वर्षापासून नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला नांगरगाव भांगरवाडी या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पुणे हे स्वतः या कामाची पाहणी व लोणावळा शहरातील इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 5 जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत.
- लोणावळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, तसेच लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारती देखील 80 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण ही कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. पुढील कामांना गती देण्यासाठी वाढीव निधी देण्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.
लोणावळा शहरातील भाजी मंडई विकसित करत असताना येथील अस्तित्वात असलेले व्यवसायिक यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्या पद्धतीने आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांना दिले. येथील कामगारांचा वारसा हक्क व अनुकंप हा प्रश्न देखील पुढील काही दिवसांमध्ये सोडवला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी या आढावा बैठकीमध्ये अनेक समस्या आमदार सुनील शेळके यांच्यासमोर मांडल्या. नगरपरिषदेमध्ये वारंवार चकरा मारून देखील समस्या सुटत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. पाच जुलै रोजी जिल्हाधिकारी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत ते येण्यापूर्वी नागरिकांच्या या समस्यां न सुटल्यास जिल्हाधिकारी यांच्यासमोर या समस्यांचा पाढा वाचून दाखवला जाईल, असे देखील आमदार सुनील शेळके यांनी ठणकावून सांगितले आहे.
नागरिकांना वेळ द्या, आठवड्यातील एक दिवस निश्चित करा – शेळके
लोणावळा मुख्याधिकारी नागरिकांना भेटत नाहीत नागरिकांची योग्य प्रकारे संवाद साधत नाहीत, अशा अनेक तक्रारींची सरबती या आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी केली. त्यावर लोणावळा मुख्याधिकारी यांनी नागरिकांना वेळ देण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करावा त्या दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहत नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांना दिल्या आहेत. तसेच अधिकारी वर्गाने नागरिकांना उलट उत्तरे देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway
