Dainik Maval News : लोणावळा शहरातील कचरा उचलण्यासह इतर आणखी सहा निविदा एकत्रित करून चढ्या दराने ही निविदा एका बड्या कंपनीच्या घशात घालून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत लोणावळा जागरूक नागरिक मंचाच्या माध्यमातून सर्वपक्षीय आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलनात स्वतः आमदार सुनिल शेळके सहभागी झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा जागरुक नागरिक मंच यांनी गुरुवारी (दि.20 सप्टेंबर) रोजी निषेध मोर्चा आणि बेमुदत साखळी उपोषणाचा निर्णय जाहीर केला होता. उपोषणासाठी पालिकेकडे मंडपाची परवानगी मागितली होती, परंतू ती दिली गेली नाही. तरी देखील मोर्चेकरांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला. मोर्चा नगरपरिषद कार्यालयाजवळ आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पसमूहातील महापुरुषांना हार घालण्यासाठी आंदोलक गेले असता, शिल्प समूहाचे दार कुलूपबंद केल्याचे दिसून आले.
याप्रकारामुळे मोर्चेकरांच्या रोषाचा भडका उडाला आणि आंदोलक घोषणाबाजी करीत नगरपरिषदेच्या कार्यालयात शिरले. सर्वजण दुसऱ्या मजल्यावरील मुख्याधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमले. पोलिसांनी सर्वांना त्याठिकाणी रोखले. मात्र संतप्त आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी सुरू केली. आमदार सुनील शेळके देखील याठिकाणी आले आणि ते आंदोलनात सामील झाले.
- आमदार सुनील शेळके यांनी यावेळी पोलीस प्रशासनाने मुख्याधिकारी यांना येथून घेऊन जावे आणि जोवर या सर्व प्रकरणाची आणि ठेक्याची चौकशी होत नाही तोवर मुख्याधिकारी यांना नगरपरिषदेमध्ये पाय ठेऊ न देण्याची भूमिका घेतली. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पुढे येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
मुख्याधिकारी यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय घेत शिल्पसमूहाचे द्वार बंद करण्याच्या त्यांच्या निर्णयाच्या विरोधात पोलीस चौकशी तसेच कारवाईचे आश्वासन आणि निविदा प्रक्रियेबाबत तात्काळ जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवण्याचे आश्वासन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात मुख्याधिकारी यांना तहसीलदारांच्या गाडीत बसवून कार्यालयातून बाहेर काढण्यात आले.
अधिक वाचा –
– आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी रविंद्र भेगडे सरसावले । BJP Ravindra Bhegade
– वडगाव नगरपंचायतीचा ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम, अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून वृक्षलागवड । Vadgaon Maval
– तळेगाव नगरपरिषदेच्या शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध । Talegaon Dabhade