Dainik Maval News : नारळी पौर्णिमा म्हटलं की अनेकांच्या ओठांवर येतं ते, ‘सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा, मनी आनंद मावना कोलीयचा दुनियाचा’ हे कोळीगीत. खरेतर या गीतांच्या बोलांमधूनच आपल्याला समजतं की, नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजाचा असून तो त्यांच्यासाठी अत्यंत खास आहे. श्रावणी पौर्णिमा या दिवशीच कोकण भागात, समुद्रकिनारीलगतच्या प्रदेशात नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि त्या किनाऱ्याभोवती असलेला कोकणचा भाग हे महाराष्ट्राला लाभलेले वैभव आहे. यासोबतच कोकणातील सांस्कृतिक वैविध्य यानेही महाराष्ट्राला समृद्ध केलेले आहे. त्यामुळेच या लेखातून आपण कोकणातील प्रत्येक कोळीबांधवांसाठी खास असलेला सण म्हणजेच, नारळी पौर्णिमेबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊयात.
मंडळी, वर सांगितल्याप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आज सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट रोजी यंदाचा नारळी पौर्णिमा सण आला आहे. नारळी पौर्णिमा सणाची खास बाब म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी आहेत. ( Narali Poornima Festival Information Traditions Significance In Marathi Kolibandhav and Narli Purnima )
का साजरी केली जाते नारळी पौर्णिमा?
कोळीबांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा आहे. प्रथा, परंपरा आणि स्थानिक रुढींनुसार या सणाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. पावसाळा सुरु झाला की सर्व कोळीबांधव त्यांच्या होडी, नावा, नौका या किनाऱ्याला बांधून ठेवतात आणि मासेमारी बंद करतात. या काळात समुद्र हा खवळलेला असतो, त्यामुळे खवळेल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी कुणीही जात नाही. मात्र, नारळी पौर्णिमा म्हणजेच श्रावणी पौर्णिमेला सर्व कोळीबांधव या समुद्राची पुजा करतात.
पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा, यासाठी प्रार्थना करतात. तसेच, पुढे समुद्राचा कोप होऊ नये, मासेमारी करणाऱ्या किंवा समुद्रात वाहतूक करणाऱ्या कोळी बांधवांच्या जहाजे, नौका या सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा, यासाठी कोळी बांधव श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात. पुजेच्यावेळी समुद्राला सोन्याचा नारळ म्हणजेच नारळाला सोनेरी वेष्ठण लावून तो नारळ समुद्रात अर्पण करतात. म्हणूनच, या सणाला नारळी पौर्णिमा, असे म्हणतात. तसेच, सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर याच दिवशी काही कोळी बांधव त्यांच्या होड्या, नावा घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रातही जातात.
कसा साजरा होतो कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा सण?
कोळी बांधवांसाठी हा सण अत्यंत महत्वाचा असल्याने या दिवशी ते प्रचंड आनंदी असतात. अत्यंत पारंपारिक पध्दतीने हा सण साजरा केला जातो. कोळी बांधव त्यांचा पारंपारिक वेष परिधान करतात. कमरेला रूमाल, अंगात टीशर्ट आणि डोक्याला कोळी लोकांची टोपी असा पुरुषांचा पेहराव असतो. तर, स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करतात आणि म्हणायला गेलं तर सोन्याने अक्षरशः मढतात. कोळी स्त्रिया कायमच सोन्याचे भरपूर दागिने अंगभर घालतात, हे त्यांचे वैशिष्ट्येच आहे.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव त्यांच्या बोटींना रंगरंगोटी करून त्या सजवतात. बोटींना पताका वगैरे लावल्या जातात. त्यानंतर बोटींची पुजा करूनच त्या मासेमारीकरता समुद्रात लोटतात. जसे की कोळी बांधव मासेमारीसाठी समुद्रात जातात, त्यावेळी कोळीण स्त्रिया या धन्याचे रक्षण कर, सागराला खरेतर दर्या देवाला दंडवतच घालतात.
- नारळी पौर्णिमेचा खास नैवद्य :
नारळी पौर्णिमेच्या दिवशी खास पद्धतीने नैवद्य बनवण्याची प्रथा आहे. खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. तसेच, काही कोळी पाड्यांवर रावस माशाचा तळलेला तुकडा देखील या नैवेद्यामध्ये ठेवला जातो. अनेक भागात सर्व पारंपारिक पद्धती पूर्ण झाल्या की कोळी पाड्यांवर पारंपारिक गीते गात मिरवणुका काढल्या जातात. विविध स्पर्धा भरवल्या जातात. तसेच, पारंपारिक गीतांवर नृत्य देखील केले जाते.
नारळी पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व :
तसे पाहाता जगाचा इतिहास पाहिल्यास आपल्याला पुर्व काळापासूनच अधिकाधिक सण हे निसर्गाशी जोडलेले दिसून येतात. त्यातही हिंदू बांधवांचे सर्वाधिक सण हे पर्यावरण आणि निसर्गाशी निगडीत आहेत. नारळी पौर्णिमा हा देखील त्यापैकीच एक सण. आपले संपूर्ण कुटुंब पाठीमागे ठेवून भरसमुद्रात कोळी बांधव मासेमारीसाठी जातो. अशावेळी त्याच्या घरी असणाऱ्या कुटुंबीयांना त्यांची काळजी वाटणे साहजिकच आहे. त्यातूनच धर्म, प्रथा-परंपरा यातून निसर्गाला आणि पर्यायाने समुद्राला, वरुणराजाला आपल्याकडे देव मानले जाते. त्यामुळेच समुद्र म्हणजे दर्यादेवाची आपल्यावर कायम कृपा रहावी. आपल्या कुटुंबाचा कर्ता सुरक्षित रहावा, यासाठी कोळी भगिनी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पुजा करुन त्याला साकडे घालत असतात. ( Narali Poornima Festival Information Traditions Significance In Marathi Kolibandhav and Narli Purnima )
अधिक वाचा –
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर