Dainik Maval News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची नियुक्ती करण्यात आली. यात आमदार सुनील शेळके यांचा समावेश असून एकप्रकारे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. या कोअर कमिटीत आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, नामदेव दाभाडे, दीपक हुलावळे, महादू कालेकर, नामदेव ठुले, भरत येवले, काळुराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, संदीप आंद्रे, साहेबराव कारके, नारायण ठाकर, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, प्रकाश हगवणे, जीवन गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाने आमदार शेळके यांना उमेदवारी दिली आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बापूसाहेब भेगडे यांनी बंडखोरी करत निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही विभागले गेले आणि राज्यात फूट पडूनही एकसंध राहिलेल्या मावळ तालुका राष्ट्रवादीमध्ये फूट पडली.
दरम्यान निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पक्षाच्या ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांची बैठक होऊन कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. आगामी काळात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने कोअर कमिटीच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीला सुरुवात झाली असल्याचे दिसते. आगामी सर्व निवडणुका व पक्ष संघटना बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णयासाठी ही कमिटी मार्गदर्शन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’