मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज मंगळवारी (दिनांक 13 जून) दुपारच्या सुमारास लोणावळा शहराजवळ एक भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर कुणेगाव पुलावर एक ऑईल टँकर पलटी होऊन आगीचा भडका उडाला. या आगीत पुलावर आणि पुलाखाली झालेल्या एकूण अपघातात चार निष्पापांचे जीव गेले तर काहीजण जखमी झालेत. अपघातानंतर आगीने रौद्ररुप धारण केल्याने एक्सप्रेस वेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक तासाभराहून अधिक काळ ठप्प झाली होती. ( Oil Tanker Fire on Mumbai Pune Expressway Near Lonavala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आगीच्या ज्वाळांनी परिसर अतिउष्ण बनला होता. हजारो प्रवासी यावेळी पुलावर ट्राफिकमध्ये अडकले होते. यात लहानग्यांपासून प्रौढांपर्यंत ते वृद्धांपर्यंत अनेकजण होते. भरदुपारी हा अपघात घडल्याने काही स्थानिक युवक आणि नागरिक हेही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखून कुणाच्याही विचारापलीकडील कार्य केले.
‘पुलावर ट्राफिकमध्ये अडकलेल्या नागरिकांना तहान भूक लागली असेलच…’ हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी विनाविलंब हे मदतकार्य सुरु केले. दोरीच्या सहाय्याने अन्न आणि पाणी वर पाठवण्यात आले. हे दृश्य अनेकांनी कॅमेरात कैद केलंय. कमीत कमीत शंभराहून अधिक प्रवाशांना पाणी आणि अन्न दिल्याचे साहील संतोष बोके (युवासेना उपशाखाप्रमुख, केवरेगाव) आणि दिनेश मालपोटे यांनी दैनिक मावळला सांगितले.
आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, जेव्हा दोन्ही ठिकाणी माणुसकीचे झरे वाहू लागतात, तेव्हा बचावकार्य अधिक सुरळीत आणि लवकर पार पडते. या स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत टँकर अपघातावेळी केलेली ही मदत कदाचित इतर लोक विसरतील, पण गरमाईच्या तडाख्यात आणि आपत्तीच्या मुखाशी असलेल्या ज्यांना ज्यांना थंड पाणी आणि अन्न मिळाले, ते प्रवासी मात्र हे ऋण कधीही विसरु शकणार नाहीत. टीम ‘दैनिक मावळ’कडून या सर्व शिलेदारांना खुप खुप धन्यवाद!! ( Oil Tanker Accident On Mumbai Pune Expressway Local Citizens Help Passengers Stuck In Traffic With Food And Water )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पेटला, 3 जणांचा होरपळून मृत्यू, पाहा भीषण अपघाताचा Live व्हिडिओ
– अखेर प्रयत्नांना यश!! पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आणखीन 2 डब्यांची जोड, रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आनंद