Dainik Maval News : मावळ तालुका हा भातशेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. यातही पवन मावळ विभाग हा इंद्रायणी तांदळासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते. यंदा तालुक्यात जवळपास तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड झाली आहे. सद्यस्थितीस पवनमावळ भागात भातशेतीवर करपा आणि कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होईल की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. करपा या रोगाचा प्रादुर्भाव पवनमावळ सह तालुक्यातील इतर ठिकाणीही दिसून येत आहे. परंतु, या करपा रोगावर नियंत्रण मिळविण्याबाबत कृषी विभागाचे क्षेत्रीय कृषी सहाय्यक अधिकारी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देत मार्गदर्शन करत आहेत.
भात पिकावरील करपा व कडा करपा रोग नियंत्रणासाठी काय उपाय कराव्यात याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना रोग पडलेल्या पिकावर औषधे फवारणे करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
अशी करा फवारणी –
१) २५६ ग्रॅम कॉपरऑक्सिक्लोराइड
किंवा १० ग्रॅम कार्बेन्डाझिम
किंवा ६ ग्रॅम ट्रायसायक्लोझोल
किंवा २५ ग्रॅम मॅन्कोझेब
यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आणि
२) स्ट्रेप्टोसायक्लीन १.५ ग्रॅम व ३) स्टिकर २० मिली
असे वरील तिन्ही मिश्रण १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रोगाच्या तीव्रतेनुसार दोन ते तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने घ्याव्यात, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून, व्हॉ्टसअप मेसेजेस, सोशल मीडियाच्या माध्यमातून काय उपायोजना कराव्यात याची माहिती शेतकऱ्यांना पाठवत आहेत. ज्याठिकाणी प्रशिक्षण, शेतीशाळा घेतल्या जात आहेत, त्यामध्येही मार्गदर्शन करत आहेत. प्रत्यक्ष शेतीवर जावून कोणती औषध फवारणी करावी, याची माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास तात्काळ कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी. – विकास गोसावी, कृषी सहाय्यक, शिळींब
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके
– वडगाव नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी संपावर ; सामान्यांची कामे रखडणार । Maval News