Dainik Maval News : मावळ तालुक्यातील अनेक खेडी आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता दूर झाली आहे. मावळातील गावखेड्यांसह पिंपरी-चिंचवड शहराला पाण्याचा पुरवठा करणारे प्रमुख पवना धरण आजमितीस (दि. 19 ऑगस्ट) 99.70 टक्के जवळपास शंभर टक्के भरले असून नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
पवन मावळ परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना धरण क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. तसेच धरण देखील शंभर टक्के भरले असल्याने धरणाचे सहाही दरवाजे उघडून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पवना नदीची पाणीपातळी वाढली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी बारा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार धरण क्षेत्रात सकाळपासून 31 मि.मी. पाऊस झाला आहे, तसेच धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने धरणात पाणी सतत येत आहे. त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे सहाही दरवाजे उघडले असून धरणाच्या सांडव्यावरून 4320 क्युसेक तर विद्युतगृहातून 1400 क्युसेक असा एकूण 5720 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज लक्षात घेता आणि पाण्याचा येवा लक्षात घेत धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो. नागरिकांनी खबरदारी बाळगावी. नदीकाठच्या नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच नदीपात्रापासून दूर राहावे, असे आवाहन व सुचना धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी
