Dainik Maval News : मुंबई व पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शनिवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास एका खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला, ज्यात बसमधील २६ प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (दि.९) पहाटे पाचच्या सुमारास द्रुतगती मार्गावरील नवीन बोगद्यात कि.मी. ३९.३०० येथे हा अपघात झाला. ट्रक क्रमांक (कए ५६ ५६७५) वरील चालक महेश भीम रेड्डी मुसाने (वय ३१, रा. जि. बिदर, कर्नाटक) याने ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला अर्थात तिसऱ्या लेनवर उभा केला होता. त्यावेळी पाठीमागून येणारी खासगी बस (क्रमांक एमएच ०३ डीव्ही २४१२) वरील चालक बालाजी बळीराम सूर्यवंशी (वय ४१ वर्ष रा. खराबवाडी, जि.लातूर) याला अचानक ट्रक समोर दिसल्याने त्याचे नियंत्रण सुटून ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
यावेळी बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर व किरकोळ झालेल्या सर्व प्रवाशांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ रवाना केले आहे. सदर अपघातातील बस व ट्रक ही दोन्ही वाहने आयआरबीच्या पथकाने बाजूला घेऊन तिन्ही लेन वरील वाहतूक सुरळीत केली आहे.
अपघातात बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बाहेर काढले. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत कार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुसाणे गावच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, महिलेवर गुन्हा दाखल । Maval Crime
– मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर – पाहा वेळापत्रक । Maval Vidhan Sabha
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन समारंभ सोमवारी पार पडणार । Maval News