Dainik Maval News : केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात पुणे-लोणावळा तिसरी-चौथी मार्गिका, पुणे-नागपूर वंदेभारत गाडी सुरू करणे, पुणे-अहिल्यानगर, पुणे-नाशिक, इंदौर-मनमाड, जालना-मनमाड नवीन मार्गिकांची कामे, पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि परिसरातील स्थानकांचा विस्तार यांच्यासह राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे लवकरात लवकर मार्गी लावणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हडपसर (पुणे) ते जोधपूर या नव्या रेल्वे गाडीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली, या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दौंड-मनमाड दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. इंदौर-मनमाड, जालना-मनमाड नवीन मार्गिकांची कामे आणि त्यासंदर्भातील कार्यवाही वेगाने सुरू आहेत.
- 23 हजार 78 रुपयांचे बजेट महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहे. 1 लाख 73 हजार करोड रुपयांचे रेल्वे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. 11 वंदेभारत ट्रेन महाराष्ट्रातून धावत आहेत. रेल्वेमध्ये प्रवाशांच्या खानपानासाठी अत्याधुनिक किचनमध्ये बनवण्याचे काम सुरू आहे. 900 किचन तयार होणार आहेत, त्यापैकी 550 आधुनिक किचन तयार करण्यात आलेले आहेत. याचा प्रवासी लाभ घेत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाचा विकास टोकियो जंक्शनप्रमाणे
पुणे रेल्वे स्टेशन शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे साहजिकच याचा विस्तार करण्यासाठी जमिन अपुरी पडत आहे. त्यामुळे या स्थानकाचा विकास कसा करायचा, याबाबत आमचे नियोजन सुरू आहे.
टोकियो जंक्शनवर जशा गाड्या फक्त प्रवासी उतरवण्यासाठी थांबतात. तेथे देखभाल दुरूस्तीसाठी गाड्या थांबवता येत नाहीत. त्या तेथुन जवळच असलेल्या स्थानकावर जातात. त्याप्रमाणेच पुणेस्थानकावर देखील नियोजन करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले आहेत. या सोबतच पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहे.
त्याकरिता पुणे रेल्वे स्थानकावरील सर्व लाईन प्लॅटफॉर्मसाठी वापरल्या जातील, अन् येथील स्टेबलिंग लाईन आळंदीसह हडपसर, खडकी, शिवाजीनगर या स्थानकांवर स्थलांतरीत केल्या जातील. त्याचा आराखडा तयार झाला आहे. याचे बारीक निरीक्षण आम्ही केले आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
पुणे-लोणावळा मार्गिकेचा डीपीआर तयार
पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार आहे. याचा रेल्वेने डीपीआर तयार केला आहे. या मार्गिकेच्या कामासाठी आता राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा असून, मंजुरी मिळाल्यावर लगेचच केंद्राच्या कॅबिनेटचीही मान्यता मिळेल, त्यामुळे हा पुणे-लोणावळा तिसर्या चौथ्या मार्गिकेचा रखडलेला प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक । Pune News
– पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ‘असा’ करा अर्ज । Pune News
– पवना धरणात अवघा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक ! 30 जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam
– राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडूंना घवघवीत यश । Lonavala News