Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार, मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन तीन दिवसांच्या आत मागे घेण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तसेच जिल्हास्तरावर झालेल्या गौण खनिजविषयक कारवाया तात्काळ मागे घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. या आश्वासनानंतर महसूल अधिकारी-कर्मचारी संघटनांनी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून अधिकारी-कर्मचारी कामावर रुजू होतील, असे संघटनांनी स्पष्ट केले.
मुंबई मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात राज्यातील विविध महसूल संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत एकूण १३ मुद्यांवर जवळपास ३ तास सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रकरणात निलंबित अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन तीन दिवसात मागे घेणार, त्यासाठी विभागीय आयुक्तांकडून तात्काळ अहवाल मागिवणार, पालघरमधील कर्मचाऱ्याचे निलंबन तात्काळ मागे घेण्यातयेईल, असे आश्वासन देण्यात आले. यासोबतच विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ या मुख्य महासंघाशी जोडलेल्या महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, विदर्भ पटवारी संघ (नागपूर-२), विदर्भ (राजस्व निरीक्षक) मंडळ अधिकारी संघ, नागपूर, विदर्भ कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, महाराष्ट्र राज्य महसूलसेवक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महसूलमंत्र्यांनी दिलेले आश्वासन व विविध विषयाबाबत सकारात्मक भूमिका याबाबत शुक्रवारपासून पुकारण्यात आलेले राज्यव्यापी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले आहे.
चुकीच्या कामाला माफी नाही – महसूलमंत्री बावनकुळे
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे, त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, नैसर्गिक न्यायानुसार त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येत आहे. पुढील तीन दिवसांत स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. अनावधानाने झालेल्या चुकीला एकवेळ माफी देता येईल. मात्र, जाणीवपूर्वक केलेल्या चुकीला माफी मिळणार नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

