Dainik Maval News : भाद्रपद महिना मुख्यत्वे ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. परंतू भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला होणारे हरितालिका पूजन आणि गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद पंचमी दिवशी येणारा ऋषी पंचमी हाही दिवस तितकाच महत्वाचा आहे. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रिया भक्तीभावे करतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचप्रमाणे प्रदेशानुसार ह्या दिवसाला अनेक प्रथा परंपराही जोडल्या गेल्या आहेत. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात पारंपारिक पद्धतीने महिला वर्ग ऋषी पंचमी साजरी करतात. पवन मावळातील मौजे शिळींब गावात दैनिक मावळ टीमने स्थानिक महिलांशी संवाद साधत ह्या दिनाचे महत्व आणि येथील परंपरा समजून घेतली. ( Rishi Panchami Know About Puja Vidhi And Significance In Marathi )
ऋषी पंचमीचे महत्व :
भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे पूजा करतात. त्यामुळे या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाल्याचे समजते. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते.
पवन मावळ भागात ऋषीपंचमीची वेगळी परंपरा :
शिळींब गावात अनेक वर्षांपासून महिला वर्ग एकत्रित येऊन ऋषीपंचमी साजरी करतात. दिवसभर कडक व्रत अर्थात उपवास करुन सर्व महिला एकत्र येतात. प्रत्येक घरातील महिला एका ठिकाणी गोळा होतात. जवळ मंदिर अथवा देव्हाऱ्यात ऋषीची पुजा मांडली जाते. त्यानंतर सर्व महिला मनोभावे ऋषीची पुजा करतात. ऋषीची पुजा करण्यापुर्वीच सर्व महिला मिळून गावाजवळ उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या गोळा करतात. त्या रानभाज्या शिजवल्या जातात. जोडीला वरईची भाकरी आणि भात असतो. ऋषीची पुजा झाल्यानंतर सर्व महिला बंद खोलीत गोळा होऊन दिवसभर पाळलेला कडक उपवास त्याच रानभाज्या खाऊन सोडतात.
ऋषी हे रानावनात राहणारे, त्यामुळे रानात जे पिकतं तेच खाण्याची ही परंपरा आहे. तसेच काहीवेळा ऋषींप्रमाणे कठोर म्हणून हे व्रत दिवसभर कडक उपवास करुन पुर्ण केले जाते. त्याच्या जोडीला उपवास सोडताना कुणाही पुरुषाचे अथवा प्राण्याचे मुख न पाहण्याचीही परंपरा या भागात आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन । Lonavala News
– सोमाटणे येथे अंमली पदार्थ जप्त, तरुणाला अटक । Talegaon Dabhade
– शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत असणार एक ‘योजनादूत’, इथे करा अर्ज