Dainik Maval News : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात सासरच्या मंडळींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे.
वाकड परिसरात जागा घेण्यासाठी, नणंदेला नोकरी लावून देण्यासाठी तसेच नवीन प्लॅट घेण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात सासरच्या मंडळींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. वडगाव मावळ येथील सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला.
पती इरफान जलालखान आलमेल (वय ३१), सासरे जलालखान एच. आलमेल (वय ६७), सासू यास्मीन जलालखान आलमेल (वय ६०) आणि नणंद फरहान समीर सय्यद (वय ३३, सर्व रा. आमन बंगलो, भाटिया कॉलनी, तळेगाव) यांना वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. विवाहितेने याबाबत फिर्याद दिली होती. दंडाची रक्कम नुकसान भरपार्इ म्हणून पत्नीला देण्यात यावी, असे त्या आदेशात नमूद होते. या आदेशाचा विरोधात सासरच्या मंडळींनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तेथे सरकारी वकील स्मिता चौगले यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली.
वाकड येथे जागा घेण्यासाठी एक कोटी २० लाख रुपये, नणंदेला नोकरीला लावण्यासाठी पैसे द्यायचे असल्याने त्यासाठी ११ लाख रुपये आणि सोने देण्याची मागणी सासरच्या मंडळींनी केली होती. तसेच पत्नीने तिच्या पगारातून वाकड येथे ८० लाख रुपयांचा प्लॅट घेऊन द्यावी, अशी मागणी करत पतीने व सासरच्या लोकांनी फिर्यादी यांचा छळ केला. मला घटस्फोट दे नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी देखील पत्नीने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सासरच्यांनी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.
आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. पैशांसाठी फिर्यादी यांचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देवून छळ करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. चौगले यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना