Dainik Maval News : सध्या मावळ परिसरात धो-धो पाऊस सुरू आहे. तसेच मे पासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्ग चांगलाच बहरला आहे. यातही पर्यटननगरी लोणावळा शहर परिसरात निसर्गाला आलेला बहर पाहण्यासाठी आणि वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक शहरात येत आहेत. परंतु इथे येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
लोणावळा शहरात आल्यावर पावसात भिजल्यानंतर पर्यटक भुट्टा खाणे, भजी खाणे आणि वडापाव खाणे याला अधिक पसंती देतात. यामुळे लोणावळ्यात या खाद्य पदार्थ विक्रेत्यांची अनेक दुकाने आहेत. त्यात काही प्रसिद्ध उपहारगृहे आहेत. परंतु यातीलच एका प्रसिद्ध वडपाव च्या दुकानात ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लोणावळ्यातील या प्रसिद्ध वडापावच्या दुकानात चक्क सडके बटाटे आणि खराब पाण्याचा वापर अन्न पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याची गंभीर व संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
- लोणावळ्यातील प्रसिद्ध वडापाव दुकान चौधरी वडापाव येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत या दुकानाच्या किचनमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. यात सडलेले बटाटे, उंदराने कुरतडलेला भाजीपाला आणि अस्वच्छता आढळून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
चौधरी वडापावच्या किचनमध्ये आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तपासणीत उघड झाले. किचनमध्ये खूप घाण होती. उंदरांनी धुमाकूळ घातला होता. तसेच, खराब अन्नसामग्री साठवलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, काही सडलेले आणि उंदरांनी खाल्लेले बटाटे वडापावमध्ये वापरले जात होते. दुकानात साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले होते. कामगार हातमोजे किंवा टोपी न वापरता वडापाव बनवत होते. हात धुण्याची पुरेशी सोय नव्हती. स्वयंपाकघरात झुरळे आणि उंदीर फिरत होते.
- हे दुकान लोणावळ्यातील मध्यवर्ती भागात आहे. याच परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, नर्स, डॉक्टर आणि पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी येतात. अशा ठिकाणी आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन करणे धोक्याचे आहे. लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळी जीथे पर्यटकांची सतत ये-जा असते, अशा ठिकाणी हा किळसवाणा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने चौधरी वडापाव सेंटरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने नागरिकांना अशा गैरव्यवहार करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ :
View this post on Instagram
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना