Dainik Maval News : महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी झाला. विठोबा जगनाडे हे महाराजांचे वडील होत. विठोबा जगनाडे आणि आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.
सतराव्या शतकात महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून त्या काळचे संत आपल्या समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत होते. तेव्हा संत तुकाराम महाराज यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली होती. एकदा संत तुकाराम महाराज संताजी महाराज यांच्या गावी कीर्तनासाठी आले होते. तुकोबांचे कीर्तन ऐकून संताजी महाराजांच्या मनावर मोठा प्रभाव पडला.
त्यानंतर संताजींनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र संसारात राहून परमार्थ साधता येतो, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितल्यानंतर त्यांनी विचार बदलला. परंतु तेव्हापासून संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांमध्ये सहभागी झाले.
गाथांचे केले पुनर्लेखन – संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या सावलीत राहून त्यांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविण्यात आल्या. मात्र तुकोबारायांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना तोंडपाठ होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व अभंग जसेच्या तसे पुन्हा लिहून काढले.
जगनाडे महाराजांबाबत प्रसिद्ध आख्यायिका – असे म्हटले जाते की, मृत्यूनंतर शेवटच्या क्षणी तुमच्या पार्थिवावर माती टाकण्यासाठी येणार असे वचन संत तुकाराम महाराजांनी संत जगनाडे महाराजांना दिले होते. मात्र तुकाराम महाराज हे जगनाडे महाराजांच्या अगोदर वैकुंठाला गेले. त्यानंतर संताजी महाराजांचे निधन झाले, तेव्हा कितीही प्रयत्न केले तरी महाराजांचे संपूर्ण शरीर मातीत गाडले जात नव्हते. त्यांचा चेहरा सतत वर राहत होता. तेव्हा आपले वचन पूर्ण करण्यासाठी वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आले आणि त्यांनी ३ मुठी माती टाकली. त्यानंतर जगनाडे महाराजांचा संपूर्ण देह झाकला गेला., अशी आख्यायिका आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ