Dainik Maval News : कासारसाई-दारूंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज, बुधवारी (दि. १६ ) कासारसाई येथे कारखान्याच्या सभागृहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी कारखान्याचे संस्थापक विदुरा उर्फ नाना नवले यांची एकमताने निवड झाली आहे. सोबतच उपाध्यक्ष पदी आश्चर्यकारकरित्या अनिल लोखंडे यांची निवड झाली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
- मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे एकहाती वर्चस्व आहे. एकमेव हिंजवडी ताथावडे गटात झालेल्या निवडणूकीतही पॅनलचेच विदुरा उर्फ नाना नवले, दत्तात्रय जाधव, चेतन भुजबळ हे उमेदवार विजयी झाले होते. यासह कारखान्याचे सर्वच्या सर्व २१ संचालक हे शेतकरी विकास पॅनलचे आहेत.
मुळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले होते. परंतु हिंजवडी-ताथवडे गटात तीन जागांवर चार अर्ज शिल्लक राहिल्याने कारखान्याच्या इतिहासात प्रथमच निवडणूक झाली. परंतु निवडणूक अंती शेतकरी विकास पॅनलचेच एकहाती वर्चस्व सिद्ध झाले. यानंतर प्रत्यक्ष अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यावर ही निवडणूक मात्र अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली.
नाना नवले व अनिल लोखंडे यांची निवड
सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने ही निवडणूक कारखान्याचे संस्थापक विदुरा उर्फ नाना नवले यांच्या नेतृत्वात लढली होती. तसेच हिंजवजी-ताथावडे गटातून निवडणुकीतही ते निवडून आले, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे नाना नवले ह्यांचीच कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. परंतु उपाध्यक्षपदी मात्र आश्चर्यकारकरित्या खेड-हवेली-शिरूर मतदारसंघातील संचालक अनिल लोखंडे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दोघांचे अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली.
( Shri Sant Tukaram Sugar Factory President Vice President election unopposed Nana Navale as President )