Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मौजे वाकसाई येथे बेकायदेशीररित्या लोखंडी सळई ताब्यात ठेवून संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या सहा इसमांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तब्बल १३ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे वाकसाई गावाच्या हद्दीत शितल ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही इसम कंटेनर ट्रकमधून लोखंडी सळई काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरत असून चोरीचा माल लपवून ठेवला आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह तात्काळ छापा टाकला. छाप्यादरम्यान शितल ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आयसर टेम्पो (क्र. एमएच १६ सीडी ५१९८) मध्ये लोखंडी सळई घेऊन आपले अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न करत असलेले सहा इसम आढळून आले. पोलिसांनी त्यांना जागीच ताब्यात घेतले.
मुसय्यद मोहम्मद इस्माईल शेख (वय २९), सनीदेओल रामअवतार राजभर (वय ३२), हाकीनुर अब्दुल गणी सा (वय ३८), अकलेश कुमार रामानंद राजभर (वय २८), सनीराज उर्फ रविंद्र रामतोल राजभर (वय १९), पवन उर्फ अजयकुमार सोमई राजभर (वय १९) (सर्व आरोपी मूळ रहिवासी उत्तर प्रदेश राज्यातील) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आरोपींकडे आयसर टेम्पोमधील लोखंडी सळईबाबत चौकशी केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच सदर मालाबाबत कोणतीही बिल्टी, पावती किंवा मालकी दर्शवणारी कागदपत्रे सादर न करता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हे आरोपी चोरी व चोऱ्या करून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींकडून ६ टन वजनाची लोखंडी सळई व आयसर टेम्पो असा एकूण १३,६०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार जय पवार, योगेश सवाने, केतन तळपे तसेच पोलीस नाईक किशोर पवार यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रे. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट

