पवनानगर : पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेली अत्याधुनिक व तंत्रज्ञानयुक्त तसेच निर्यातक्षम गुलाब फुलांची रोपवाटिका ही आदर्शवत असून तालुक्यातील सर्व तरुण शेतकऱ्यांनी याचा आदर्श घेऊन अत्याधुनिक शेती पद्धतीत तालुक्याचे नावलौकिक करावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले. ( state of the art plant nursery in Yelse village near Pavananagar )
पवनानगर परिसरातील येळसे (ता. मावळ) येथे पवना फुल उत्पादक संघाच्या वतीने 5 एकर क्षेत्रात ‘साई रोझेस नर्सरी’ ही अत्याधुनिक पद्धतीने गुलाब फुलांची रोपवाटिका तयार करण्यात आली. या रोपवाटिकेची माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, लोहगड विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन गणेश धानिवले, मावळ पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी संताजी जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष नारायण ठाकर, भाजपा माजी तालुका सरचिटणीस संदीप भुतडा, सूर्यकांत सोरटे, विठ्ठल शेंडगे, भाजपा काले-चांदखेड गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आडकर, पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, येळसे गावच्या माजी सरपंच सीमाताई ठाकर, साई रोझेस कंपनीचे संचालक प्रदीप ठाकर, यांसह पवना फुल उत्पादक संघाचे सर्व संचालक व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ तालुका हा देशातील सर्वात जास्त गुलाब फुलांचे उत्पादन घेणारा तालुका आहे. परंतु त्यासाठी लागणारी रोपे (वान) हे परराज्यातून आणावी लागत होती. यामध्ये अनेक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत होता. जसे की दर्जेदार रोपे न मिळणे, वेळेत न मिळणे, अनेकवेळा आर्थिक व्यवहारातून देखील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्हायची, पिळवणूक व्हायची, त्यामुळे मावळ तालुक्यातच अत्याधुनिक रोपवाटिका सुरु करण्याचा निर्णय पवना फुल उत्पादक संघाने घेतला. सुरुवातील 10 गुंठ्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही रोपवाटिका सुरू करण्यात आली. त्यानंतर त्यात अभ्यास करून हळूहळू जम बसवला.
- रोपाच्या दर्जावर सर्वात मोठे काम केले. त्यामुळे बाजरात नाव टिकून राहिले आणि त्याचेच फलित म्हणून गेल्या तीन वर्षात या व्यवसायाचे वटवृक्षात रूपांतर होऊन आता हे क्षेत्र पाच एकरवर गेले आहे. त्यामुळे वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख रोपे तयार होतील अशा क्षमतेची सुसज्ज स्वयंचलित नर्सरी अत्याधुनिक शेती पद्धतीत तालुक्याचे नावलौकिक करत आहे. याच नर्सरीद्वारे मावळातील सर्व शेतकऱ्यांची गरज भागवून राज्य व देशभरात झाडे निर्यात केली जातात. विविध प्रयोगांतून काळजीपूर्वक झाडाची गुणवत्ता जपल्यामुळे परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात येथील झाडांना मागणी आहे. पूर्वी परराज्यातून झाडे घेताना फसवणूक होऊन हताश झालेले शेतकरी आता मावळ तालुक्यातच झाडे उपलब्ध होत असल्याने आता समाधानी दिसत आहेत.
‘साई रोझेस नर्सरी’ या अत्याधुनिक व स्वयंचलित नर्सरीमध्ये सद्यस्थितीला 14 प्रकारची (रंगांच्या) रोपे तयार केली जातात. यामुळे जवळजवळ 60 लोकांना रोजगार उपलब्ध झाला. सुरुवातीपासूनच चांगल्या दर्जाची रोपे तयार करून त्याची विक्री केल्याने शेतकऱ्यांची मने जिंकता आली. यामधूनच व्यवसायात आर्थिक भरभराट आली. यावर्षी 2 एकर क्षेत्र वाढविल्याने आणखी काही रंगांच्या (जातीच्या) झाडांचे उत्पादन घेता येईल. – मुकुंद ठाकर (उद्योजक, साई रोझेस नर्सरी)
अधिक वाचा –
– राज्यात 8 महिन्यात 29 हजार 807 महिला-मुली हरवल्याच्या तक्रारी; 5 हजार 495 अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेण्यात यश
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवा; खासदार बारणेंचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
– मोठी बातमी! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाचा संपूर्ण आदेश