पुणे ग्रामीण मंडलच्या राजगुरुनगर विभागाअंतर्गत कामशेत शाखा कार्यालय इथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असणारे प्रमोद लक्ष्मणराव महाजन या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ग्राहकाच्या वीज बिलाची थकबाकी असताना देखील तिथे नवीन वीज जोड कनेक्शन देणाऱ्या, नागरिकांना सतावणाऱ्या आणि त्यांच्याशी उद्धटपणे वागणाऱ्या महावितरणच्या प्रमोद महाजन या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याने वीज ग्राहक आणि तक्रारदार यांनी आनंद व्यक्त केला आहे. ( Suspension of Assistant Engineer Pramod Mahajan of Mahavitaran Kamshet Division In Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 18 मार्च रोजी दैनिक मावळ ने सर्वात आधी ही बातमी प्रसिद्ध करुन नागरिकांच्या तक्रारीला वाचा फोडली होती. महावितरण चा महसूल बुडवून चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना नवीन कनेक्शन देणाऱ्या कामशेत विभागातील महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रमोद महाजन यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती.
वडगाव मावळ येथील उपकार्यकारी अभियंता यांनी देखील प्रमोद महाजन यांना याबाबत खुलासा मागितला होता. तसेच, अनेकदा स्मरण पत्र लिहून खुलासा करण्याचे सांगितले होते. मात्र, प्रमोद महाजन यांना वारंवार पत्र लिहून देखील त्यांनी खुलासा केला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी वडगाव उपविभागीय कार्यकारी अभियंता विवेक सूर्यवंशी यांनी राजगुरुनगर कार्यकारी अभियंता यांना कळवले होते. राजगुरुनगर कार्यकारी अभियंता यांच्याही खुलासा करण्याच्या पत्रावर प्रमोद महाजन यांनी उत्तर न पाठवल्याने अखेर पुणे परिमंडलच्या सक्षम अधिकाऱ्यांनी याबाबत पाऊल उचलले आहे.
पुणे ग्रामीण मंडल, पुणे यांचे अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी प्रकाश शामराव राऊत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, दिनांक 23 मार्चपासून ते पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत, म.रा.वि.वि. कंपनी मर्या कामशेत शाखेचे सहाय्यक अभियंता प्रमोद लक्ष्मणराव महाजन यांचे निलंबित करत असल्याचा आदेश पारित केला आहे.
वीज ग्राहकांनी व्यक्त केला आनंद ;
“गेल्या 14 महिन्यांच्या आमच्या लढ्याला यश आले आहे. 14 महिन्यांपूर्वी आम्ही प्रमोद महाजन या अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती. त्याचा पाठपुरावा देखील केला. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नव्हती, ना चौकशी होत होती. अखेर आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला आणि त्यांना तक्रार अर्ज केले. अखेर वरिष्ठांनी या भ्रष्ठ अधिकाऱ्याची चौकशी लावत त्याचे निलंबन केले आहे. आमच्या लढ्याला यश आले आहे. महावितरणचे आम्ही धन्यवाद मानतो.” – सुवर्णा शैलेश रावल (मु.पो. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे)
अधिक वाचा –
– देशातल्या ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचा समावेश, पहिल्या स्थानी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे
– पुणे जिल्ह्यात 187 गावांत राबवणार जलयुक्त शिवार अभियान 2.0, मावळ तालुक्यातील ‘या’ 13 गावांचा समावेश