पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच आता मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरातून ‘हिट अँड रन’चे प्रकरण समोर आले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी भरधाव वेगाने वाहन चालवत दोन कारला ठोकर दिली आणि घटना घडल्यानंतर बेजबाबदारपणे घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काल, शनिवारी (दि. 1 जून) रोजी तळेगाव दाभाडे शहरातील काका हलवाई दुकानासमोर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील कार चालवत तळेगाव स्टेशन मार्गावरून जात होते. तेव्हा काका हलवाई दुकानाजवळ आल्यानंतर त्यांनी दोन कारला पाठीमागून धडक दिली. हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ( Talegaon Nagar Parishad CEO NK Patil hit and run Case Maval Taluka )
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वाहनांना धडक देणाऱ्या कारमध्ये स्वतः मुख्याधिकारी असल्याने नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. परंतू नुकसान झालेल्या कार चालकाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सिद्धराम इरप्पा लोणीकर ( वय 37, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुख्याधिकारी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांनी मद्यपान केल्याची तक्रार फिर्यादींनी केली आहे.
गंभीर बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर मुख्याधिकारी पाटील हे त्यांचा घरी गेले. घटनास्थळावर न थांबता त्यांनी त्यांचे घर गाठले आणि स्वतःला कोंडून घेतले. त्यांना आणण्यासाठी काही पोलीस कर्मचारी गेले. परंतु त्यांनी घराचा दरवाजा उघडला नाही. अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रायन्नावर हे अधिकचा फौजफाटा घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या घरी गेले, त्यानंतर पाटलांनी दरवाजा उघडला. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
अधिक वाचा –
– पवना धरणात 23.90 टक्के पाणीसाठा, कधीपर्यंत पुरेल हे पाणी? वाचा अधिक । Pavana Dam Updates
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार
– मान्सून तोंडावर… मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगात, पेरणीची कामे अंतिम टप्प्यात !