Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघासह राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि. 20) मतदान पार पडले. मावळ मतदारसंघातील 402 मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत मतदान संपन्न झाले. मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती. परंतु लोणावळा शहर व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर रांगा असल्याने रात्री उशीरापर्यंत मतदान सुरु राहिले. त्यामुळे मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही मतदारसंघातील अंतिम आकडेवारी समोर आली नव्हती. परंतु आता ही आकडेवारी समोर आली असून मावळ विधानसभेत एकूण अंतिम 72.59 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मावळात, बुधवारी सकाळी 7 ते दुपारी 6 व नंतर काही वेळ झालेल्या एकूण मतदानात मतदारांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला. रात्री उशीरा हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळ विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदार संख्या 3 लाख 86 हजार 172 मतदारांपैकी 1 लाख 44 हजार 214 पुरुष मतदारांनी मतदान केले. तर 1 लाख 36 हजार 102 महिला मतदारांनी मतदान केले. इतर तीन मतदार सहीत एकूण 2 लाख 80 हजार 319 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मावळ विधानसभेत एकूण 72.59 टक्के मतदान झाल्याचे आता गुरुवारी (दि.21) दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. अद्याप अधिकृत कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आले नसले, तरीही तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी दिलेली आहे. यंदाची मतदानाची टक्केवारी ही मावळ विधानसभेतील मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या विक्रमी मतदानाचा फायदा कुणाला होणार आणि कुणाला फटका बसणार याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.