Dainik Maval News : पवन मावळातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पवनानगर येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये केवळ तीन दिवसांत ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पवनानगर ही पवन मावळातील ४० गावांची मुख्य बाजारपेठ असून येथे शासकीय रुग्णालय, बँका, शाळा, महाविद्यालये यांसारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे कायमच मोठी वर्दळ असते. मात्र, वाहनचालकांकडून रस्त्यावर कुठेही पार्किंग केल्यामुळे चौकात तासनतास वाहतूक कोंडी होत होती.
तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर आणि बेडसे लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होते. यामुळे वाहतुकीचा ताण आणखी वाढत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती.
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही मोहीम राबवली. पोलीस नाईक नवनाथ चपटे, जय पवार, प्रवीण गंगजे, पवन कराड आणि संजय पंडित यांच्या पथकाने बाजारपेठेत फिरून अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. गेल्या तीन दिवसांत ४४ वाहनांवर जॅमर लावण्यात आले असून ही मोहीम आता दररोज सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे झाले असून नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. मनमानी पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना आता थेट जॅमर लावून कारवाई होत असल्याने बेशिस्तीवर चांगलाच आळा बसण्याची शक्यता आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


