Dainik Maval News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी असे दोन नवे रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार आहेत. पुणे ते अहिल्यानगर या मार्गात वाघोलीवरून वढू बुद्रुक, शिक्रापूर तसेच अन्य मार्गाद्वारे अहिल्यानगरपर्यंत रेल्वे जाणार आहे. या मार्गात एकूण आठ रेल्वे स्थानके (स्टेशन) असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली.
वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दोन पर्यायी रेल्वेमार्ग तयार करण्यात येत असून, त्याबाबत पुण्यात सर्किट हाउस येथे चर्चा करण्यात आली. त्याबाबत पवार यांनी माहिती दिली. ‘पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन रेल्वे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यात तळेगाव-चाकण-उरळी, तर पुणे- अहिल्यानगर या दोन्ही नवीन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांसाठी भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी कार्यवाहीदेखील सुरू केली आहे. पहिला रेल्वे प्रकल्प चार वर्षांत, तर दुसरा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
‘तळेगाव हे मावळ तालुक्यात येते. लोणावळा, कर्जत, तळेगाव, पुणे ही पारंपरिक रेल्वेलाइन पूर्वीपासूनच सुरू आहे. आता नवीन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पानुसार तळेगाववरून चाकण, चाकणवरून वाघोली, वाघोलीवरून उरुळी आणि उरुळीवरून सोलापूर-पुणे रोडवर रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे. तळेगाव-उरुळी हा प्रकल्प साधारण ७५ किलोमीटर लांबीचा असून, पूर्णपणे नवीन रेल्वेमार्ग होईल. दुसरा एक मार्ग मिरज रोडवरून मिरज रेल्वेला जोडला जाणार आहे,’ असे पवार म्हणाले.
‘दुसरा रेल्वे प्रकल्प वाघोलीवरून वढू बुद्रुक, शिक्रापूर, अहिल्यानगर या मार्गे जाणार आहे. या मार्गात एकूण आठ स्टेशन असतील. पुण्यावरून कोरेगाव भीमा, शिक्रापूर, रांजणगाव, पिंपळनेर मार्गे अहिल्यानगरपर्यंत हा मार्ग जाणार आहे. ज्यामुळे रांजणगाव एमआयडीसी, सुपे, अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना रेल्वेचा फायदा होणार आहे,’ असे पवार यांनी सांगितले.
याशिवाय, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमआरडीसी) रिंग रोड ताथवड्यापासून सातारा मार्गे जाणारा रस्ता रुंदीकरणासह सुरू आहे. बेंगळुरू महामार्गावरील मुकाई चौक ते मुळा नदी हा रस्तादेखील सुधारला जाणार असल्याचे पवार म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळा शहरात एका युवतीवर कारमध्ये विविध ठिकाणी सामुहिक बला’त्कार, एक आरोपी अटकेत । Lonavala Crime
– मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी कागदपत्रे पडताळणीनंतर ठरल्या ‘नावडत्या’
– लग्नाचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख 81 हजारांची फसवूणक; मावळमधील घटना, गुन्हा दाखल । Maval Crime