Dainik Maval News : ट्रकमधून वाहून नेले जाणारे लोखंडी पाइप पडून दोन महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. हा अपघात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा जवळील बोरघाटात झाला.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरवरील सहप्रवासी ऋतुजा चव्हाण (वय २६, रा. नऱ्हे, पुणे), आणि कारमधील सहप्रवासी अंकिता शिंदे (वय २८, रा. मोशी) यांचा अपघातात मृत्यू झाला. तर, स्कूटरस्वार वैभव गलांडे (वय २९, रा. वारजे, पुणे), कारमधील सोनाली खडतरे (वय ३०, रा. मोशी), शिवराज खडतरे (वय ६), ललित शिंदे (वय ३१), लता शिंदे (वय ५०) हे जखमी झाले आहेत.
ट्रकद्वारे खोपोली येथून लोणावळ्याकडे लोखंडी पाइप नेले जात होते. दरम्यान, ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे जोराचा धक्का बसून ट्रकमधील पाइप निसटले आणि मागे असणाऱ्या स्कूटरवरील सहप्रवासी महिला आणि कारमधील महिलेच्या अंगावर कोसळले. यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींवर खोपोली शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक मदत केंद्र पोलिस, आयआरबी कर्मचारी, देवदूत यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे स्वयंसेवक धावून आले. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित