Dainik Maval News : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे “वडगाव साहित्य-कला-संस्कृती मंडळाची” स्थापना करण्यात आली. मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या अनेक कार्ययोजनांचे बीज रोवले गेले. ( Vadgaon Literature Art Culture Board established in Vadgaon Maval platform for budding writers )
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अजित देशपांडे यांनी मंडळ स्थापनेचा हेतू व उद्दिष्टे विशद केली. “वडगाव शहर वेगाने आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना, येथील होतकरू साहित्यिक, कवी, नाट्यकलाकारांसाठी एक सशक्त व्यासपीठ आवश्यक होते. या गरजेतूनच मंडळाची स्थापना करण्यात आली,” असे ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी या मंडळासाठी सर्वतोपरी सहकार्य व पुढील काळात वडगाव येथे नाट्यगृह, वाचनालय व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प बोलून दाखविला.
संस्थेचे बाळासाहेब बोरावके यांनी “मनोरंजनाबरोबरच संस्कारयुक्त शिक्षणही महत्त्वाचे आहे,” असे सांगत वाचन संस्कृती वाढविण्यावर भर दिला. सुप्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांनी “वडगाव मावळ हे केवळ ऐतिहासिकच नव्हे तर आता सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्व प्राप्त करेल,” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात रोहिणी भोरे यांनी ‘पंचसूत्री’ सादर केली. चैतन्य भोरे या युवकाने महाभारतातील अर्जुनावर आधारित शालेय जीवनात इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रतीक्षा पाटील यांनी ‘पुस्तक भिशी’ ही अभिनव संकल्पना मांडली. ॲड. स्वाती मोहिते यांनी मंडळामुळे नवीन चेतना निर्माण झाल्याचे सांगितले.
डॉ. रवी आचार्य यांनी वडगाव मावळसारख्या ठिकाणी कला मंडळाची स्थापना होणे ही काळाची गरज असल्याचे सांगत भावगीत सादर केले. जेष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी मंडळाच्या स्थापनेची तुलना नदीच्या उगमाशी करत, भविष्यकाळात या मंडळाचे कार्य महासागरासारखे व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवानंद कांबळे यांनी ‘स्मीतकला रंजन संस्था’ स्थापनेचा इतिहास उलगडला. सुनील किर्लोस्कर यांनी “बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत” हे शीर्षक गीत सादर केले.
वडगाव कला संस्कृती मंडळाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना संधी, साहित्यिक उपक्रमांचे आयोजन, मराठी साहित्याचा प्रसार, पारंपरिक वाद्यांचे संकलन यांसारखे विविध उपक्रम राबविले जाणार असून, दर महिन्याला एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
अधिक वाचा –
– वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक । Pune News
– पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ‘असा’ करा अर्ज । Pune News
– पवना धरणात अवघा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक ! 30 जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे । Pavana Dam
– राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मावळ तालुक्यातील खेळाडूंना घवघवीत यश । Lonavala News