Dainik Maval News : हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई करीत डोणे गावच्या हद्दीत छापा टाकला. या कारवाईत अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि तयार दारू असा एकूण १,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एक महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २० ऑक्टोबर रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी डोणे गावच्या हद्दीत कंझारभट वस्ती, डोणे – दिवड रोड जवळ पाण्याच्या टाकी समोर भागात ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तपासणी केली असता, आरोपीकडून अवैध हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य सापडले.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत जिजाभाऊ भोईर, पोलीस हवालदार गार्डी, पोलीस हवालदार संजय सुपे तसेच म्हस्के यांनी ही संयुक्त कारवाई केली.
45 वर्षीय महिला आरोपीवर गुन्हा क्र. २८९/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(क)(फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी गजानन टोंम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
