Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील टाकवे बुद्रुक परिसरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात महिला, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येत्या पंधरा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
टाकवे शहर वीज ग्राहक कृती समितीच्या वतीने याबाबतचे निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके, गट विकास अधिकारी पंचायत समिती वडगाव मावळ, महावितरणचे अधिकारी आणि महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांना देण्यात आले आहे. कृती समितीचे राजू शिंदे, माजी उपसरपंच स्वामी जगताप, जीप संघटना अध्यक्ष उल्हास असवले, माजी चेअरमन दत्ता घोजगे, माजी चेअरमन दिलीप आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते.
टाकवे बुद्रुक हे गाव आंदर मावळातील चाळीस गावांची मुख्य बाजार पेठ आहे. त्यामुळे नागरिकांची येथे नियमित रहदारी असते. मात्र, विजेच्या लपंडावामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक व्यवहार, ई सेवा केंद्र, टाकवे शहराचा पाणीपुरवठा, शेतकऱ्यांच्या मोटारी, लघु उद्योग आदी सर्व बाबींवर याचा विपरीत परिणाम होत आहे.
टाकवे बुद्रुक परिसरात अनेक वर्षांपासून वीज पुरवठ्याची समस्या गंभीर आहे. त्या अनुषंगाने वडगाव मावळ महावितरण कार्यालयात अनेक वेळा ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांच्या मार्फत पत्र व्यवहार केले आहेत. काही कामे त्यांनी हाती घेतली आहेत. मात्र काही कामे अपूर्ण राहिली आहेत. यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून टोलवा – टोलीची उत्तरे मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तरी महावितरण विभागाने राहिलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागाची राहील असे माजी सरपंच भूषण असवले म्हणाले.
माघील काही महिन्यांपासून येथे विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी महिला व नागरिक हैराण झाले आहेत. महिलांना पहाटे उठून घरकाम आवरून काहींना कामाला जायची घाई असते. त्यात मुलांची शाळा, पुरुषवर्गाला कामाला जाण्याची गडबड यात वीज सारखीच गायब होत असते. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे महावितरण कर्मचारी कोणी लक्ष देत नाही. दाद मागायला महिलांनी तरी कुठे जायचे? समस्यांचे निवारण करुन नागरिकांना न्याय द्या, एवढीच माफक अपेक्षा असल्याचे महिला दक्षता समिती अध्यक्षा मंगल टेमगिरे म्हणाल्या.
अधिक वाचा –
– कल्हाट, पवळेवाडी गावातील विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; गावकऱ्यांकडून आमदारांचे जल्लोषात स्वागत । Maval News
– आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कुसगाव बुद्रुक येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले राजगडाची भव्य प्रतिकृती, आमदार शेळकेंकडून कौतूक