पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयामार्फत आयोजित ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पर्यटनक्षम गावांनी ५ मे पर्यंत ऑनलाईन नामांकन दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशातील ग्रामीण पर्यटनाचा विकास आणि प्रोत्साहनासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण पर्यटनाचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून देणाऱ्या गावाचा गौरव करण्यासाठी ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धा सुरू केली आहे. ग्रामीण विकास, समुदाय कल्याण आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपदेचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या गावांमध्ये स्पर्धात्मकता वाढीस लागावी, इतर गावांना प्रेरणा मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय या प्रत्येक टप्प्यावर ३ सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे निवडली जाणार आहेत. निवडण्यात आलेली गावे पुढील टप्प्यावरील स्पर्धेसाठी पुढे पाठवली जातील. या प्रकारे राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट पर्यटन गावांची निवड होईल. राष्ट्रीय स्तराव निवडण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट पर्यटन खेड्याचे संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेद्वारे (युएनडब्ल्यूटीओ) घेण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ (बेस्ट टुरिझम व्हिलेज) स्पर्धेसाठी नामांकन पाठविण्यात येईल.
सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेत भाग घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने विकसित केलेल्या https://nidhi.nic.in/BVC/AboutDetail.aspx या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी https://rural.tourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– किवळे दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये; ‘वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे’ – नगरसेविका पुजा वहिले
– ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2’ ची घोषणा ते दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय