पुणे जिल्हा : जुन्नर वनविभागातील मागील 5 वर्षातील बिबट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी व मृत्यूच्या घडलेल्या घटना लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम (30) (2) (iii) व (iv) अन्वये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील 233 अतिसंवेदनशिल गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागामध्ये समावेश असून या वन विभागाचे क्षेत्र व्यवस्थापनाच्यादृष्टीने अनुक्रमे जुन्नर, ओतूर, मंचर, बोडेगाव, खेड, चाकण व शिरुर या सात वनपरिक्षेत्रामध्ये विभागलेले आहे. जुन्नर वन विभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे सिंचन प्रकल्प आहेत. यात प्रामुख्याने घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिपळगांव जोगे, बडन, चिल्हेवाडी, चासकमान असे मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प असल्याने सिंचन सुविधेत वाढ झालेली आहे. ( villages in Junnar Ambegaon Khed Shirur have been declared potential leopard disaster prone areas )
पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस, केळी, द्राक्ष, डाळींब अशी दिर्घकालीन बागायती पिके या भागात मोठ्या प्रमाणात होतात. या दिर्घकालीन पिकांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी उत्तम निवारा आणि पाण्याची मुबलक उपलब्धता असते. तसेच शेती व्यवसायामुळे मानवाची पाळीव प्राण्यांसह शेतातील रहिवासांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पाळीव प्राणी भक्ष्य म्हणून सहज उपलब्ध होत असल्याने बिबट या वन्यप्राण्यांचा अधिवास अशा बागायती क्षेत्रातच निर्माण झालेला आहे. बिबट्यांचे वास्तव्य हे प्रामुख्याने ऊस शेतीत आहे. या प्रकरणी गेल्या 23 वर्षापासून या वनविभागात मानव बिबट संघर्षामध्ये वाढ होत आहे.
भारतीय वन्यजीव संस्थान, डेहराडुन या संस्थेमार्फत जुन्नर वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेल्या अभ्यासाअंती या क्षेत्रात बिबट वन्यप्राण्याच्या संख्येची घनता प्रति 100 चौ.कि.मी. मध्ये 6 ते 7 बिबटे इतकी आढळून आली आहे. तसेच बिबट्यांचे मानवावरील, पशुधनावरील हल्ले पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर या तालुक्यांमध्ये बिबट्यांची एकुण संख्या अंदाजे 400 ते 450 असण्याची शक्यता आहे. जुन्नर वनविभागात मागील 5 वर्षात बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 40 गंभीर जखमी व 16 मृत्युच्या घटना घडलेल्या आहेत.
या क्षेत्रात बिबट्याचा मानवावरील हल्ला होण्याच्या घटनेत वाढ झाली असून सदरचे क्षेत्र हे मानव-बिबट संघर्षाचे आपत्तीक्षेत्र झालेले आहे. बिबट वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत्युच्या घटनेची व्याप्ती लक्षात घेता सदर क्षेत्र “संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषीत करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– मावळातील दिंड्यांकडून आमदार सुनिल शेळकेंचा सन्मान ; आमदार शेळके संतांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे गौरोद्गार
– मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत’ घालतेय साद । Maval News
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे