Dainik Maval News : भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६’ राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंगळवारी (दि. २४ मार्च २०२६) रोजी दुपारी ३:३० वाजता शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या संदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी अधिकृत आदेश जारी करत तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मतदार यादी होणार अधिक अचूक व पारदर्शक
या विशेष पुनरीक्षण मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक विश्वासार्ह करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पुढील उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
अस्पष्ट छायाचित्रे वगळणे: मतदार यादीतील अस्पष्ट, अयोग्य किंवा मानवी स्वरूपाशी विसंगत छायाचित्रांची तपासणी करून ती हटविणे
दुबार नोंदींची छाननी: ‘डेमोग्राफिक सिमिलर एन्ट्रीज’ शोधून एकाच व्यक्तीच्या पुनरावृत्ती नोंदी दुरुस्त करणे
मॅपिंग प्रक्रिया: सध्याच्या यादीतील मतदारांचे २००२ च्या अंतिम यादीशी संगती लावून पडताळणी
तांत्रिक चुका दुरुस्त करणे: तर्कहीन व तांत्रिक त्रुटी दूर करून यादी अधिक पारदर्शक बनविणे
सर्व स्तरांवरील सहभागाला प्राधान्य
या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच लोणावळा, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ आणि देहू येथील नगरपरिषदांच्या प्रशासनालाही सक्रिय सहभागाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“लोकशाही बळकटीसाठी अचूक यादी गरजेची”
“मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणे ही सशक्त लोकशाहीची मूलभूत गरज आहे. या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करत नागरिकांमध्ये जनजागृती करावी,” असे आवाहन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले.
एकूणच, ‘SIR २०२६’च्या माध्यमातून मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम, त्रुटीमुक्त आणि आधुनिक करण्याच्या दिशेने प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

