Dainik Maval News : पवन मावळ भागातील चावसर या दुर्गम गावातील महिला भगिनींना पाण्यासाठी नित्यनेमाने संघर्ष करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांची फरफट होत असून पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे. पाणी नियोजन होत नसल्याने अखेर आता ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चावसर गावात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सध्या गावात प्रशासक राज असून गावचा कारभार हाती असणारे ग्रामसेवक देखील पाणीपुरवठ्याकडे लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक, प्रशासक व बीडीओ यांना निवेदन दिले असून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास वडगाव मावळ येथील पंचायत समिती कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
- चावसर येथील महिला भगिनींनी यापूर्वीही पाण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु तत्कालीन गटविकासअधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनीही पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गावात पाणी सोडण्याच्या वेळा पाळल्या जात नसून मनमानी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी व्यवस्था करणारे कर्मचारी वेळेवर पाणी न सोडणे, चार चार दिवस पाणी न सोडणे, कधी कधी गावात पंधरा दिवस पाणी नसते, आम्ही पाणी का येत नाही? असे विचारले तर उडवा उडवीची उत्तरे देऊन पाणी येणार नाही असं सांगत असल्याचे तक्रार निवेदनात म्हचले आहे.
तसेच, आम्ही ग्रामस्थ मंडळी अशा प्रश्न उत्तरांना कंटाळलेला आहोत. गावात पाणी पुरवठा नित्य नेमाने होत नसल्याने गावातील महिलाना २ ते ४ किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागते. आमची अशी मागणी आहे की येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही पंचायत समिती वडगाव मावळ येथे कार्यालयात येऊन आंदोलन करणार आहोत, असे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे. याबाबत ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या संपर्क होऊ शकला नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई